गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

महाशिवरात्रीपूर्वी मार्कंडेश्‍वरातील रखडेलेल काम पूर्ण करा

(खा. अशोक नेते यांची दिल्लीत पुरातत्व विभागाच्या अधिकार्‍यांशी बैठक)

विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडेश्‍वर मंदिराच्या जिर्णोद्धाराच्या कामावर गुरूवारी 8 फेब्रुवारी रोजी खासदार अशोक नेते यांनी दिल्लीत पुरातत्व विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत बैठक घेतली. या कामात जी काही प्रशासकीय अडचण असेल तरी तातडीने दूर करून येत्या महाशिवरात्रीपूर्वी हे रखडलेले काम पुन्हा सुरू करा, असे निर्देश खासदार नेते यांनी या बैठकीत दिले.

भारतीय पुरातत्व विभागाकडून केले जात असलेले या मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम गेल्या 4 ते 5 वर्षांपासून रखडलेले आहे. वर्षभरापूर्वी, म्हणजे फेब्रुवारी 2023 मध्ये मुख्य मंदिरासाठी आणि आवारातल्या इतर छोट्या मंदिरांच्या कामांसाठी असे दोन वेगवेगळे टेंडर काढण्यास पुरातत्व विभागाने नव्याने मंजुरी दिली होती. मात्र मुख्य मंदिराच्या टेंडरची प्रक्रिया पुरातत्व विभागाने अजूनही पूर्ण केलेली नाही. त्यामुळे खासदार नेते यांनी पुरातत्व विभागाचे महानिर्देशक, उपनिर्देशक यांच्या बैठकीत अधिकार्‍यांना धारेवर धरले. एकमेकांकडे टोलवाटोलवी करू नका आणि येणार्‍या महाशिवरात्रीपूर्वी विभागाच्या प्रशासकीय अडचणी दूर करून रखडलेले टेंडरचे काम पूर्ण करा व या कामाला सुरूवात करा, असे निर्देश दिले.
यानंतर दिल्लीतील अधिकार्‍यांनी नागपूर येथील पुरातत्व विभागाचे अधीक्षक अरुण मलिक यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून त्यांना या कामाबद्दल निर्देश दिले. विशेष म्हणजे, चार दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्कंडा येथे घेतलेल्या आढावा बैठकीतही पुरातत्व विभागाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले होते. आजच्या बैठकीने हे काम आता लवकर मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.