ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेसाठी पूर्व प्रशिक्षण परीक्षा संपन्न

मुंबई, दि. ५ : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा सन २०२३ करिता भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रातील विनामूल्य प्रवेश परीक्षा राज्यातील सात केंद्रांवर ऑफलाईन पद्धतीने यशस्वीरित्या झाल्याची माहिती, राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेच्या संचालकांनी दिली.

उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (सीॲक) मुंबईचे भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती व नागपूर, तसेच राज्य शासनाच्या अखत्यारितील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) संचलित डॉ. आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र (एसीईसी) पुणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचलित सावित्रीबाई फुले अकॅडेमी, पुणे या सर्व केंद्रातील प्रवेश परीक्षा दि. ४ डिसेंबर २०२२ रोजी राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद कोल्हापूर, नागपूर व अमरावती या सात केंद्रांवर ऑफलाईन पद्धतीने यशस्वीरित्या झाली.

मुलाखतीचा कार्यक्रम राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था मुंबईच्या संकेतस्थळावर लवकरच जाहीर करण्यात येईल. या परीक्षेतून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार व संस्थेची प्रवेश क्षमता आणि प्रवेशाबाबतच्या नियमाप्रमाणे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा सन २०२३ करीता विनामूल्य प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था मुंबईचे संचालक तथा सामायिक प्रवेश परीक्षा समन्वयक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.