अंमलबजावणी समितीच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या सूचना
जिल्ह्यात हिवताप आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाययोजना जनजागृतीच्या माध्यमातून प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज दिल्या
हिवताप प्रतिबंध अंमलबजावणी समितीची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. पंकज हेमके यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
हिवतापाचा अधिक प्रादुर्भाव असलेल्या कोरची व भामरागड व तेलंगणा राज्य सिमेलगतच्या भागात हिवताप नियंत्रणासाठी स्वच्छता, प्रतिबंधक उपाय आणि लक्षणांबाबत माहिती, शिक्षण आणि संवादाच्या माध्यमातून गावागावात जागरूकता निर्माण करण्यासाठी जनजागृती मोहिमा राबवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
पावसाळ्यापूर्वीच्या तयारीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे आणि गाव पातळीवर, विशेषतः दुर्गम गावांमध्ये पुढील पाच महिन्यांसाठी आरडीके (रॅपिड डायग्नोस्टिक किट) आणि सर्व प्रकारची मलेरियाची औषधे उपलब्ध करून द्यावी. ज्या उपकेंद्रांमध्ये वार्षिक परजीवी प्रमाण पाचपेक्षा अधिक आहे, अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात आरडीके द्वारे तपासणी करावी. हिवतापाचे प्रमाण कमी करण्यासाठी एकत्रित कीटक नियंत्रण उपक्रमही राबवावे. लार्वा नियंत्रण जाळ्यांचे वाटप करणे, डासांची उत्पत्ती रोखणे, गप्पी मासे सोडणे, नागरिकांना मच्छरदाणीचा नियमित वापर करण्यास प्रोत्साहित करणे, प्राथमिक आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांचे सक्षमीकरण करणे, त्यांना आवश्यक प्रशिक्षण देणे व त्यांच्याकडून वेळेवर प्रतिबंधक उपायांची अंमलबजावणी करून घेणे, यांसारख्या उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. हेमके यांनी जिल्ह्यातील हिवताप प्रतिबंधात्मक उपायोजनाची माहिती दिली. जिल्ह्यात 2022 मध्ये 9205, 2023 मध्ये 5866 व 2024 मध्ये 6698 असे रूग्ण हिवतापग्रस्त आढळून आले. यात तालुकानिहाय भामरागड (3695), धानोरा (1192), एटापल्ली (816), अहेरी (399), कोरची (332),कुरखेडा (262), चामोर्शी (189), गडचिरोली (१६९), सिरोंचा (105), मुलचेरा (53), आरमोरी (40) तर वडसा (3) असे एकूण मागील तीन वर्षाच्या सरासरीनुसार 7255 रूग्ण बाधीत आढल्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीला संबंधीत अधिकारी उपस्थित होते.
