मागणी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करा
महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाअंतर्गत गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये धरणामध्ये साचलेला गाळ उपसा करून धरणाची मूळ साठवण क्षमता पुनस्थापित होणार आहे. तसेच उपसा केलेला गाळ शेतात पसरविल्यास शेतीची उत्पादन क्षमता वाढून एकंदरित कृषी उत्पनात वाढ होणार आहे.
या योजनेअंतर्गत काम करणाऱ्या अशासकीय संस्था/ ग्रामपंचायत यांना यंत्रसामग्री व इंधनाचा खर्च देणे प्रस्तावित आहे. तसेच अल्प व अत्यल्पभूधारक, विधवा, अपंग व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना या योजनेचा पुरेपूर लाभ घेता येईल व अनुदानास पात्र राहिल.
भारतीय जैन संघटनेचे प्रतिनिधी हे गडचिरोली जिल्ह्यात गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेचे प्रचार प्रसार करण्याचे कार्य करित आहे. गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतक-यांनी www.shiwaar.com या संकेतस्तळावरील उपलब्ध असलेल्या BJS या अॅप वर मागणी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकणार तसेच प्रत्यक्ष जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, गडचिरोली येथे मागणी अर्ज सादर करता येईल.
तलावातील जास्तीत जास्त गाळ उपसा करण्यासाठी अशासकीय संस्था / ग्रामपंचायतीने प्रस्ताव सादर करावे असे आवाहन जिल्हाधिकारी, गडचिरोली यांनी केले आहे.
