पुणे, दि.२१ : जी-२० शिक्षण कार्यगटाच्या चौथ्या बैठकीसाठी आलेले सदस्य देशांचे मंत्री आणि प्रतिनिधींची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला. पाहुण्यांच्या सन्मानार्थ आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात सादर करण्यात आलेल्या नृत्यांच्या माध्यमातून विविधरंगी भारताचे दर्शन घडले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे जी-२० प्रतिनिधींसाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार माधुरी मिसाळ, केंद्रीय शालेय शिक्षण सचिव संजय कुमार, उच्च शिक्षण सचिव के.संजय मूर्ती, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, कुलगुरू प्रा. सुरेश गोसावी आदी उपस्थित होते.
स्वागताच्यावेळी करण्यात आलेल्या मल्लखांब प्रात्यक्षिकांनी पाहुण्यांची मने जिंकली. मर्दानी खेळ आणि लोककलांचेही यावेळी सादरीकरण करण्यात आले.
सांस्कृतिक कार्यक्रमातून भारताच्या सांस्कृतिक वैभवाचे दर्शन
भारताच्या विविध प्रांतातील लोकनृत्य यावेळी सादर करण्यात आले. त्यातून विविधरंगी भारतीय संस्कृती आणि सांस्कृतिक वैभवाचे दर्शन पाहुण्यांना घडले. बांबू नृत्य, ढोल नृत्य, दीप नृत्य, घुमर नृत्य, गरबा नृत्य, पंजाबी भांगडा, नागालँडचे लोकनृत्य, मध्यप्रदेशचे लोकनृत्य, महाराष्ट्राचे कोळी आणि लावणी नृत्य, कथ्थक आदी नृत्यप्रकार यावेळी सादर करण्यात आले. ‘कलर्स ऑफ इंडिया’ या संकल्पनेखाली कार्यक्रमाच्या शेवटी ‘वंदे मातरम’ या गीतावर सादर करण्यात आलेल्या भारतीय लोकनृत्यांच्या सप्तरंगी दर्शनाने उपस्थित प्रतिनिधी मोहित झाले. कार्यक्रम झाल्यावर काही पाहुण्यांनी स्वतः लेझीम, फुगडीचा आनंद घेतला.
कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.