गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई योजना माहिती विदर्भ

शहरात प्रस्तावित विविध विकासकामांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी केली जागेची पाहणी

गडचिरोली, ता. १ मे – गडचिरोली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या विविध प्रकल्पांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज शहरातील विविध ठिकाणी जागेची पाहणी केली. यामध्ये नुकतेच अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आलेले प्रेक्षागृह तसेच मामा तलावाचे सौंदर्यीकरण व केंद्रीय विद्यालयासाठी जागेचा आढावा यांचा समावेश होता.

पाहणी दौऱ्यात नगर परिषदेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर, तहसीलदार संतोष आष्टीकर, तसेच बांधकाम विभागाचे अभियंता अंकुश भालेराव उपस्थित होते. त्यांनी संबंधित प्रकल्पांविषयी सविस्तर माहिती दिली.

प्रेक्षागृह

जिल्ह्यात ७५० आसनक्षमतेच्या प्रेक्षागृहाच्या उभारणीसाठी अर्थसंकल्पात २७.५९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे शालेय विद्यार्थी, रंगकर्मी आणि झाडीपट्टी कलाकारांसाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. या महत्वपूर्ण बाबींसाठी संकुल परिसरात नाट्यगृह उभारण्याच्या दृष्टीने जागेची पाहणी करण्यात आली.

मामा तलावाचे सौंदर्यीकरण

शहराच्या पर्यावरणीय समतोलासाठी महत्त्वाच्या मामा तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी विविध कामांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये खाऊगल्ल्यांची निर्मिती, फुलझाडांची लागवड, आकर्षक फूटपाथ, सजावटीचे दिवे, बाके, फिरण्यासाठी ट्रॅक आणि प्रवेशद्वार यांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी पंडा यांनी या कामाची पाहणी करून कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

केंद्रीय विद्यालयासाठी जागेचा आढावा

गडचिरोली शहरात मंजूर असलेल्या केंद्रीय विद्यालयाचे बांधकाम लवकर सुरू करण्याबाबत विद्यालयाच्या पथकासोबत चर्चा झाली आहे. मात्र तोपर्यंत केंद्रीय विद्यालय इतरत्र तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्याच्या अनुषंगाने जागेची पाहणी करण्यात आली.