ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय होणार सूपर स्पेशालिटी रुग्णालय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उल्हासनगर महानगरपालिका सूपर स्पेशलिटी रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, खासदार श्रीकांत शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार कुमार आयलानी,आमदार डॉ.बालाजी किणीकर,प्रशासक तथा आयुक्त अजीज शेख आदि मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, सूपर स्पेशालिटी रुग्णालय ही काळाची गरज आहे. ही गरज ओळखून हे शासन नागरिकांना उत्तम दर्जाची आरोग्य सेवा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. ठाणे जिल्ह्यातून कॅशलेस सेवा देणारे पहिले रुग्णालय सुरू करण्यात आले, त्यानंतर आता हे उल्हासनगर महानगरपालिकेचे कॅशलेस सेवा देणारे दुसरे सूपर स्पेशलिटी रुग्णालय. अशाच प्रकारे काही दिवसातच मीरा-भाईंदर येथेही कॅशलेस सेवा देणारे सूपर स्पेशालिटी रुग्णालयाचे उद्घाटन करणार आहोत.

ते म्हणाले, रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आल्यानंतर कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला पैशांची चिंता भेडसावते. मात्र आता शासनाने महात्मा फुले जन आरोग्य योजनेची व्याप्ती ही दीड लाखाहून पाच लाखावर आणली आहे. त्यामुळे आता कोणालाही आपल्या रुग्णाच्या उपचारांसाठी होणाऱ्या खर्चाची चिंता करण्याची आवश्यकता नाही. शासनाकडून पाच लाखापर्यंतचे उपचार विनामूल्य करून देण्यात येणार आहेत.

राज्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यावर भर देताना ठाणे, मुंब्रा येथे कॅन्सर हॉस्पिटलचे काम सुरू आहे. त्याचबरोबर एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून चार हजार रुपये कोटी रुपयांची मदत राज्य शासनाला मिळणार असून त्यातून आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण करण्यात येणार आहे, असे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, हे राज्य प्रगतीपथावर आहे. विशेषतः कृषी, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि पायाभूत सुविधा या विषयांवर राज्य शासनाकडून नियोजनबद्ध काम करण्यात येत आहे. लेक लाडकी योजना, एसटीमध्ये 50% मोफत सवलत, चार कोटी महिलांची आरोग्य तपासणी अशा विविध माध्यमातून शासन महिलांसाठी आणि महिलांच्या आरोग्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. लवकरच राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील केंद्राच्या बळकटीकरणाबाबतचे कामही सुरू होणार आहे. ठाण्यातील 900 खाटांचे जिल्हा सामान्य रुग्णालय डिसेंबर अखेर पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.

राज्य शासन आरोग्य व्यवस्था अधिकाधिक उत्तम दर्जाची करण्यासाठी प्रयत्नशील आहे. तरी शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी, डॉक्टरांनी आणि आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करावा, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) रवींद्र चव्हाण,खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

उल्हासनगर महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त अजिज शेख यांनी प्रास्ताविक केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदिका तेजल बोडके-नागरे यांनी केले.