ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र

गडचिरोलीत जिल्हास्तरीय ‘जागतिक लोकसंख्या दिन’ उत्साहात साजरा

गडचिरोलीत जिल्हास्तरीय ‘जागतिक लोकसंख्या दिन’ उत्साहात साजरा तरुण पिढीने छोटे व सुदृढ कुटुंब अंगीकारावे : अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. छाया उईके नर्सिंग प्रशिक्षणार्थींच्या रांगोळीतून वाढत्या लोकसंख्येचे विदारक चित्र; कुटुंब नियोजन व लोकसंख्या लाभांशावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

गडचिरोली | प्रतिनिधी
सार्वजनिक आरोग्य विभाग, गडचिरोली यांच्या समन्वयाने तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ११ जुलै २०२६ रोजी जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त जिल्हास्तरीय उद्घाटन व जनजागृती कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. जिल्हा सामान्य रुग्णालयात आयोजित या कार्यक्रमात आरोग्य अधिकारी, डॉक्टर, नर्सिंग प्रशिक्षणार्थी, आशा स्वयंसेविका, रुग्ण व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. छाया उईके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. माधुरी किलनाके, जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. माधव शिंदे, क्ष-किरण तज्ज्ञ डॉ. नीलकंठ मसराम, बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रशांत पेंदाम तसेच सहाय्यक अधिसेविका कविता पोतरोजवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
रांगोळीतून प्रभावी जनजागृती
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते नर्सिंग प्रशिक्षणार्थींनी साकारलेले लोकसंख्या वाढीवरील संदेशपर रांगोळी प्रदर्शन. वाढती लोकसंख्या, संसाधनांवरील ताण, पर्यावरण, बेरोजगारी, शिक्षण व आरोग्यावरील परिणाम यांचे प्रभावी चित्रण रांगोळीच्या माध्यमातून करण्यात आले. प्रशिक्षणार्थींच्या कल्पकतेचे व सामाजिक बांधिलकीचे मान्यवरांनी विशेष कौतुक केले.
कुटुंब नियोजन ही काळाची गरज
उद्घाटक डॉ. छाया उईके यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी कुटुंब नियोजनाशिवाय दुसरा पर्याय नाही. समाजातील तरुणांनी जबाबदारीने पुढाकार घेत छोट्या व सुदृढ कुटुंबाची संकल्पना स्वीकारणे आवश्यक आहे. नियोजित कुटुंबामुळे माता व बालकांचे आरोग्य सुधारते, कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावतो आणि समाजाचा सर्वांगीण विकास साधला जातो, असे त्यांनी स्पष्ट केले.
दोन अपत्यांमध्ये योग्य अंतर ठेवण्याचे आवाहन
प्रमुख पाहुण्या डॉ. माधुरी किलनाके यांनी आशा स्वयंसेविका व एएनएम यांच्या भूमिकेवर भर देत सांगितले की, घरभेटीदरम्यान प्रत्येक कुटुंबाला दोन मुलांमध्ये योग्य अंतर ठेवण्याचे आरोग्यदायी फायदे, उपलब्ध कुटुंब नियोजन साधने आणि शासनाच्या सेवांची माहिती प्रभावीपणे पोहोचविणे गरजेचे आहे. यामुळे माता व बालकांचे आरोग्य अधिक चांगले राहते आणि कुटुंबाचे भविष्यही सुरक्षित होते.
लोकसंख्या लाभांश म्हणजे देशाच्या विकासाची सुवर्णसंधी
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. माधव शिंदे यांनी डेमोग्राफिक डिव्हिडंड (लोकसंख्या लाभांश) या संकल्पनेचे सविस्तर विवेचन केले. त्यांनी सांगितले की, २००५ ते २०५५ हा भारतासाठी लोकसंख्या लाभांशाचा सुवर्णकाळ असून २०३० ते २०३५ या कालावधीत त्याचा सर्वोच्च टप्पा असेल.
महाराष्ट्रात सुमारे ६५ टक्क्यांहून अधिक लोकसंख्या १५ ते ६४ वर्षे वयोगटातील असल्याने राज्याला मोठी संधी उपलब्ध आहे. विशेषतः गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तरुण लोकसंख्या आहे. या तरुणांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, कौशल्य विकास, रोजगाराच्या संधी आणि उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्यास हीच तरुणाई देशाच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीचा मजबूत पाया ठरू शकते. अन्यथा, योग्य नियोजनाचा अभाव राहिल्यास हीच परिस्थिती बेरोजगारी व सामाजिक समस्यांमध्ये रूपांतरित होण्याचा धोका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मोठ्या संख्येने उपस्थिती
या जिल्हास्तरीय कार्यक्रमाला रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, अधिपरिचारिका, परिसेविका, नर्सिंग ट्यूटर, नर्सिंग प्रशिक्षणार्थी, आशा स्वयंसेविका, बेबी वड्डे (जि.प. गडचिरोली), रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्रीमती प्रतिज्ञा रामटेके (पीएचएन) यांनी केले.
जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमातून “छोटे कुटुंब – सुदृढ कुटुंब”, कुटुंब नियोजन, लोकसंख्या लाभांश आणि तरुणांच्या कौशल्य विकासाचे महत्त्व याबाबत प्रभावी जनजागृती करण्यात आली. उपस्थितांनी कार्यक्रमातील मार्गदर्शनाचा लाभ घेत लोकसंख्या स्थिरीकरणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला.