गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

सिरोंचा तालुक्यातील वडदाम जीवाश्म उद्यान : लाखो वर्षांचा इतिहास जपणारा महाराष्ट्राचा अनमोल वैज्ञानिक ठेवा

सिरोंचा तालुक्यातील वडदाम जीवाश्म उद्यान : लाखो वर्षांचा इतिहास जपणारा महाराष्ट्राचा अनमोल वैज्ञानिक ठेवा

 | लोकरथ न्यूज | सिरोंचा

गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात वसलेले वडदाम जीवाश्म उद्यान (Waddham Fossil Park) हे महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचे वैज्ञानिक, ऐतिहासिक आणि पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. लाखो वर्षांपूर्वी पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या डायनासोर, प्राचीन मासे, वृक्ष आणि इतर सजीवांच्या जीवाश्मांचा अनमोल ठेवा या उद्यानात जतन करण्यात आला आहे. त्यामुळे हे ठिकाण केवळ पर्यटनाचे केंद्र नसून विद्यार्थी, संशोधक, विज्ञानप्रेमी आणि पर्यटकांसाठी ज्ञानाचे महत्त्वपूर्ण दालन ठरले आहे.

सन 1960-61 मध्ये भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (Geological Survey of India – GSI) च्या शास्त्रज्ञांनी सिरोंचा तालुक्यातील कोठापल्ली, वडदाम आणि परिसरात संशोधन करत असताना डायनासोरचे जीवाश्म शोधून काढले. या संशोधनामुळे सिरोंचा तालुक्याचे नाव देशभरात पोहोचले. या परिसरात सापडलेले बारापासॉरस टागोरी (Barapasaurus tagorei) या विशाल शाकाहारी डायनासोरचे जीवाश्म भारतीय पुराजीवशास्त्रातील अत्यंत महत्त्वाचा शोध मानला जातो.

वडदाम जीवाश्म उद्यानातील आधुनिक संग्रहालयात डायनासोरच्या हाडांचे जीवाश्म, प्राचीन वृक्षांचे जीवाश्म, माशांचे जीवाश्म तसेच विविध दुर्मिळ जीवाश्मांचे प्रदर्शन करण्यात आले आहे. संग्रहालयातील माहितीफलकांवर जीवाश्मांची निर्मिती, संशोधनाचा इतिहास, सिरोंचा परिसरातील जीवाश्म सापडलेली ठिकाणे आणि डायनासोरविषयीची माहिती आकर्षक पद्धतीने मांडण्यात आली आहे. त्यामुळे येथे भेट देणाऱ्या पर्यटकांना लाखो वर्षांपूर्वीच्या पृथ्वीचा इतिहास प्रत्यक्ष अनुभवता येतो.

संग्रहालयातील डायनासोरच्या मांडीच्या हाडाचे जीवाश्म, माशांचे जीवाश्म, तसेच विविध वनस्पतींचे जीवाश्म पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरत आहेत. प्रत्येक जीवाश्म पृथ्वीच्या प्राचीन इतिहासाची साक्ष देत असून या परिसराचे भूवैज्ञानिक महत्त्व अधोरेखित करतो.

या संग्रहालयात वन मजूर म्हणून कार्यरत असलेले हरिप्रसाद दासरी हे पर्यटकांना मार्गदर्शन करण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत. संग्रहालयात येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाचे ते स्वागत करून विविध जीवाश्मांची सविस्तर माहिती देतात. डायनासोरचे जीवाश्म, माशांचे जीवाश्म, प्राचीन वृक्षांचे जीवाश्म, त्यांचा शोध कसा लागला, ते किती वर्षांपूर्वीचे आहेत, त्यांचे वैज्ञानिक महत्त्व काय आहे, याबाबत ते अतिशय सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत माहिती सांगतात. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थी, संशोधक आणि पर्यटकांना संग्रहालयाची सफर अधिक ज्ञानवर्धक आणि संस्मरणीय ठरते. पर्यटकांकडून त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले जाते.

सध्या महाराष्ट्र शासनाच्या सिरोंचा वन विभागाच्या देखरेखीखाली हे जीवाश्म उद्यान सुस्थितीत विकसित करण्यात आले असून परिसर स्वच्छ, आकर्षक आणि पर्यटकांसाठी अनुकूल ठेवण्यात आला आहे. उद्यानातील संग्रहालयात माहितीपूर्ण प्रदर्शनासोबतच वैज्ञानिक वारसा जतन करण्याचे कार्यही प्रभावीपणे सुरू आहे.

पर्यटकांसाठी उद्यानाची भेटीची वेळ सकाळी ९.०० ते दुपारी १.०० आणि दुपारी २.०० ते सायंकाळी ५.०० अशी आहे. सिरोंचा शहरापासून अल्प अंतरावर असल्यामुळे एका दिवसात संपूर्ण उद्यान आणि संग्रहालयाची पाहणी सहज करता येते.

वडदाम जीवाश्म उद्यान हे गडचिरोली जिल्ह्याचा अभिमान असून महाराष्ट्राच्या वैज्ञानिक वारशाचे जतन करणारे एक महत्त्वपूर्ण केंद्र आहे. या ठिकाणी अधिकाधिक पर्यटकांनी भेट देऊन आपल्या इतिहासाची आणि वैज्ञानिक वारशाची ओळख करून घ्यावी, तसेच या अनमोल ठेव्याच्या संवर्धनासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.