ताज्या घडामोडी ताज्या बातम्या योजना माहिती विदर्भ

डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजना

डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजना

उच्च शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारितील शासकीय तसेच अशासकीय अनुदानित, अंशत: अनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालयामध्ये व अकृषि विद्यापीठे व त्या विद्यापीठाअंतर्गत असलेल्या उपकेंद्रामधील (खाजगी अभिमत विद्यापीठे तसेच स्वयं अर्थसहाय्यीत खाजगी विद्यापीठे वगळून) व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. योजना बिगर आरक्षित प्रवर्ग तसेच सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्यांना लागू आहे.

डॉ . पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजना – Dr. Panjabrao Deshmukh Vasatigruh Nirvah Bhatta Yojana:

आवश्यक कागदपत्रे:

१. सक्षम प्राधिकरणाने दिलेले अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

२. पालकांचे अल्पभूधारक शेतकरी / नोंदणीकृत मजूर असलेबाबतचे प्रमाणपत्र किंवा शैक्षणिक वर्षाच्या लगतपूर्वीच्या वित्तीय वर्षांचे संबंधित तहसिलदार अथवा सक्षम अधिकाऱ्याने दिलेले उत्पन्नाचे प्रमापणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

३. CAP संबंधित कागदपत्रे. (केवळ विधी, शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र अभ्यासक्रम)

४. गॅप संबंधित दस्तऐवज (गॅप असल्यास)

५. दोन मुलांचे कुटुंब घोषणापत्र.

लाभाचे स्वरूप:

1) व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी:

अ) ज्या विद्यार्थ्याचे पालक अल्पभूधारक शेतकरी किंवा नोंदणीकृत मजूर आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी मुंबई , पुणे महानगर क्षेत्रातील सर्व शहरे तसेच औरंगाबाद व नागपूर या शहरात वसतिगृह आहे. या महानगरातील अभ्यासक्रमासाठी निर्वाह भत्याची रक्कम ३० हजार रूपये तर इतर शहरे व ग्रामीण भागासाठी २० हजार रूपये.

ब) इतर विद्यार्थ्यांसाठी १ लाखापर्यंत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबासाठी मुंबई , पुणे महानगर क्षेत्रातील सर्व शहरे तसेच औरंगाबाद व नागपूर या शहरात वसतिगृह आहे . या महागनरातील अभ्यासक्रमासाठी निर्वाह भत्याची रक्कम १० हजार रूपये तर इतर शहरे व ग्रामीण भागासाठी ८ हजार रूपये आहे. तर १ ते ८ लाख रूपये कुटुंबाचे उत्पन असलेल्या लाभार्थ्यांसाठीही महानगरासाठी १० हजार तर इतर शहरे व ग्रामीण भागासाठी ८ हजार रूपये आहे.

2) बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी:

अ) बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी १ लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांला २ हजार रूपये निर्वाह भत्ता देण्याची तरतूद आहे.

योजनेच्या प्रमुख अटी:

१. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेस पात्र विद्यार्थी सदर योजनेसाठीही अर्ज करण्यास पात्र आहेत.

२. विद्यार्थ्याने शासकीय / निमशासकीय / खाजगी वसतिगृहामध्ये प्रवेश घेतला असल्यास त्या विद्यार्थ्याने त्याबाबतचा पुरावा अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे.

३. तसेच खाजगी मालकीच्या घरामध्ये विद्यार्थ्याने स्वतः ची राहण्याची सोय केली असल्यास अशा विद्यार्थ्यास नोंदणीकृत अथवा नोटराईज्ड भाडे कराराची प्रत अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे.

४. एखाद्या विद्यार्थ्याने सामान्य रहिवासी असलेल्या त्याच्या गावातील / शहरातील संस्थेमध्ये अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्यास त्यास निर्वाह भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.

५. सदर योजनेचा लाभ हा कुटुंबातील केवळ दोन अपत्यांपर्यंत मर्यादित आहे.

६. एखाद्या विद्याथ्र्यांस अन्य कोणत्याही योजनेखाली निर्वाह भत्ता मिळत असल्यास असा विद्यार्थी या योजनेखाली लाभ मिळण्यास अपात्र आहे.

७. विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमाच्या कालावधीकरीताच निर्वाहभत्ता देण्यात येतो. तथापि एखादा विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास अथवा काही कारणांमुळे त्याला वरच्या वर्गात प्रवेश न मिळाल्यास त्यास त्या वर्षापुरता निर्वाह भत्ता लाभ अनुज्ञेय नाही.

८. या योजनेअंतर्गत रुपये 1.00 लाखपर्यंत उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्याकरीता निर्वाहभत्त्याचा लाभ देण्याकरीता संख्येची कोणतीही मर्यादा असणार नाही. मात्र रुपये 1.00 लाख ते रुपये 8.00 लाख उत्पन्न मर्यादा असलेल्या व व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता प्रत्येक जिल्हयासाठी लाभार्थी विद्यार्थ्यांची कमाल संख्या 500 इतकी निश्चित करण्यात येत आहे. त्यापैकी 33 टक्के इतक्या जागा विद्यार्थिनीकरीता राखीव ठेवण्यात येतात. तथापि पुरेशा विद्यार्थिनी उपलब्ध न झाल्यास रिक्त राहणाऱ्या जागा त्याच जिल्हयातील विद्यार्थ्याकरीता उपयोगात आणता येतात.

९. प्रत्येक जिल्हयातील कोटा हा प्राप्त होणान्या अर्जाच्या संख्येनुसार प्रमाणशीररित्या (Proportionate) निश्चित करण्यात येतो.

ऑनलाईन अर्ज (Apply Online): नवीन मंजूरीसाठी तसेच नूतनीकरणासाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे .ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

संपर्क– शिक्षण संचालक, उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य – जिल्हा माहिती कार्यालय.