Shiv Sena Dussehra Rally at Shivaji Park : शिवाजी पार्कवरील शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या वादावर पडदा पडला आहे.
Shiv Sena UBT Dasara Melava : शिवाजी महाराज पार्कच्या मैदानावर अर्थात शिवतीर्थावर यंदा शिवसेनेच्या कोणत्या गटाचा दसरा मेळावा होणार या प्रश्न आता निकाली निघाला आहे. शिवतीर्थावर यंदा सुद्धा ठाकरेंचाच आवाज घुमणार, शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचाच मेळावा होणार हे आता स्पष्ट झालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक पाऊल मागे घेतल्यानं या वादावर पडदा पडला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मागील वर्षी शिवसेनेत उभी फूट पडली. तेव्हापासून दोन्ही गट एकमेकांवर राजकीय कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात आहेत. पहिल्या वर्षी दसरा मेळाव्याच्या निमित्तानं दोन्ही गट आमनेसामने आले होते. खरी शिवसेना आमचीच असा दावा करणाऱ्या दोन्ही गटांनी शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, ठाकरे गटाचा अर्ज आधी आल्यामुळं व खरी शिवसेना कुणाची याबाबत स्पष्टता नसल्यानं मागील वर्षी उच्च न्यायालयानं ठाकरे गटाला मेळाव्याची परवानगी दिली होती.
हेही वाचा: दसऱ्याच्या दिवशी पुण्यातून फुंकणार रणशिंग; शरद पवारांचा नवा डाव काय?
मागील वर्षभरात परिस्थितीत बराच बदल झाला. निवडणूक आयोगानं खरी शिवसेना व पक्षाचं निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे गटाला बहाल केलं. त्यामुळं यंदा दसरा मेळावा कोणाचा होणार याविषयी उत्सुकता होता. दोन्ही गटांनी आपण खरी शिवसेना असल्याचा दावा करत महापालिकेकडं अर्ज केला होता. मात्र, काही झालं तरी आमचा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार असा दावा ठाकरे गटानं केला होता. निवडणूक आयोगानं निर्णय दिला असला तरी आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अद्याप झालेला नाही. तो निर्णय झाल्यानंतरच खरं चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळं शिवाजी पार्कचं मैदान आम्हालाच मिळायला हवं असं ठाकरे गटाचं म्हणणं होतं. शिंदे गटानंही शिवतीर्थावरच दसरा मेळावा घेण्याची आग्रही भूमिका घेतली होती. मात्र, आता अचानक शिंदे गटानं माघार घेतली आहे.