आयुष्मान भारत नोंदणी उपक्रमाचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
ग्रामीण भागातील व सर्वसामान्य लोकांना त्यांच्या आरोग्याच्या गरजेनुरूप सेवासुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी डिजिटल दवाखान्याची सुविधा महत्वपूर्ण ठरेल. याद्वारे शंभर प्रकारच्या विविध चाचण्यांसह आरोग्य विभागाच्या योजना व त्याची नोंदणी सर्वसामान्यांना विनासायास करता येईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
वेगवेगळ्या संस्थांनी मिळून सीएसआर निधीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या फिरत्या डिजिटल दवाखान्याच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. फिरत्या डिजिटल दवाखान्याच्या माध्यमातून 100 प्रकारच्या विविध चाचण्या करता येणे शक्य होणार आहे. या व्हॅन गावोगावी जाणार असून आयुष्मान भारत योजनेसाठी नोंदणी करणार असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी शुभारंभानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
यावेळी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना कार्ड नोंदणी उपक्रमाचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. धरमपेठ येथील त्रिकोणी पार्क येथे आयोजित समारंभास आमदार डॉ. संदीप धुर्वे, आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे व आरोग्य यंत्रणेचे वरिष्ठ अधिकारी, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
विविध सुविधांचा मिळणार लाभ
कार्ड नोंदणीसाठी एकूण आठ व्हॅन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नोंदणी झाल्यानंतर आयुष्मान भारत कार्ड च्या माध्यमातून सर्व प्रकारच्या रेशन कार्डधारक कुटुंबांना पाच लाखांपर्यंत वार्षिक मोफत वैद्यकीय उपचार उपलब्ध होणार आहेत. 70 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिरिक्त पाच लाख रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. लहान मोठ्या 1 हजार 350 पेक्षा अधिक आजारांवर मोफत उपचार उपलब्ध होणार आहे. या योजनेचा लाभ संपूर्ण देशभर घेता येणार आहे.