अद्ययावत राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
राज्य आपत्कालीन कार्य केंद्रात आधुनिक तंत्रज्ञान, वेगवान संवादव्यवस्था आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) वापरामुळे आपत्ती व्यवस्थापनाला तंत्रज्ञानाचे बळ मिळाले आहे. या नव्या अद्ययावत आपत्कालीन कार्य केंद्रामुळे आपत्तीच्या वेळी जलद, अचूक आणि समन्वित प्रतिसाद देणे अधिक प्रभावी होणार आहे. राज्य आपत्कालीन कार्य केंद्रातील नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे केवळ आपत्तीच्या वेळी नाही, तर आपत्तीपूर्व सजगतेपासून पुनर्वसनापर्यंतची परिस्थिती व आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षमपणे हाताळता येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य आपत्कालीन कार्य केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी केले.
मंत्रालयात नवीन तंत्रज्ञानाने अद्ययावत केलेल्या राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, पर्यटन, खनिकर्म माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास अपारंपरिक ऊर्जामंत्री अतुल सावे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, मुख्य सचिव सुजाता सौनिक, ‘मित्रा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, मदत व पुनर्वसन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सोनिया सेठी,आपत्ती व्यवस्थापन संचालक सतीशकुमार खडके आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री फडवणीस म्हणाले की, हवामानातील बदलामुळे आपत्तीचे स्वरूप, तीव्रता आणि वारंवारता बदलत आहे. त्यामुळे ‘मिटिगेशन’ आणि घटनांनंतर तात्काळ प्रतिसाद यावर भर देणे आवश्यक आहे. आपत्ती व्यवस्थापनासाठी एक सशक्त ‘कमांड आणि कम्युनिकेशन सिस्टीम’ असणे महत्त्वाचे असून, निर्णय लवकर घेता यावेत, जलद प्रतिसाद देता यावा, यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातही अशा प्रकारची आधुनिक व्यवस्था उभारण्याचे काम सुरू असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. तसेच नागपूर येथे प्रस्तावित आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या स्थापनेच्या निर्णयाचेही मुख्यमंत्र्यांनी स्वागत केले.
आपत्ती येऊ नये, हीच आपली इच्छा आहे; पण आलीच, तर तिच्याशी सक्षमपणे लढण्यासाठी आपली व्यवस्था पूर्णपणे सज्ज असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस यांनी या आपत्कालीन केंद्राच्या उभारणीत योगदान दिलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच अत्यंत आधुनिक आणि सुसज्जित व्यवस्था उभी केल्याबद्दल आपत्ती व्यवस्थापन विभागास त्यांनी शुभेच्छा दिल्या.
मदतीसाठी धावून जाणारा आपत्ती व्यवस्थापन कक्ष नव्याने सुरू केला त्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागास शुभेच्छा दिल्या.
आपत्ती व्यवस्थापनाच्या संस्थात्मक बळकटीकरणात महाराष्ट्र अग्रेसर
नवे आधुनिक तंत्रज्ञान आणि व व्यवस्थापनमुळे सुसज्ज झालेले राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्रांचे आधुनिकीकरण आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्थेला मंत्रीमंडळाची मान्यता या त्रिसूत्रीमुळे आपत्ती व्यवस्थापनाच्या संस्थात्मक बळकटीकरणामध्ये महाराष्ट्र अग्रेसर असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमात आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या संकेतस्थळाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, आपत्ती सहाय्यक मोबाईल ॲपचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तर Geo-DSS या प्रणालीचे उद्घाटन आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.
अद्यावत राज्य आपत्कालीन कार्य केंद्राबाबाबत…
आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन मानकांनुसार हे केंद्र नव्याने उभे करण्यात आले आहे. नव्या SEOC मध्ये बेझल-फ्री व्हिडिओ वॉल, उच्च क्षमतेचे AV कॉन्फरन्सिंग, डेटा सर्व्हर, हाय-स्पीड संगणक, SATPHONES, हॅम रेडिओ, VHF/UHF वायरलेस सेट यांचा समावेश आहे. हे सर्व घटक आपत्तीच्या वेळी वेळेवर प्रतिसाद देण्यासाठी आणि सर्व यंत्रणांमध्ये समन्वय साधण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.
तसेच Geo-DSS या प्रणालीद्वारे AI आणि मशीन लर्निंगवर आधारित ‘चेंज डिटेक्शन’ प्रक्रिया राबवली जात आहे. ही प्रक्रिया उपग्रह इमेजरीवर आधारित असून, आपत्तीच्या ठिकाणी जवळपास प्रत्यक्ष वेळेत परिस्थिती समजून नुकसान मूल्यांकन व मदत कार्याची दिशा ठरवणे अधिक सोपे होणार आहे.
विशेष म्हणजे, ‘आपत्ती सहाय्यक’ नावाचे मोबाईल अॅप्लिकेशन सामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आले असून, यामार्फत नागरिक आपत्तीच्या वेळी SOS अलर्टद्वारे माहिती देऊ शकतात. हे अॅप द्वि-मार्गी संवादाचे एक महत्त्वाचे माध्यम ठरणार आहे.
राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या नवीन संकेतस्थळावर आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित सर्व माहिती, मार्गदर्शक तत्त्वे व उपक्रम सहज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे संकेतस्थळ नागरिक, स्थानिक प्रशासन आणि यंत्रणा यांच्यात अधिक सुसूत्रता निर्माण करण्यासाठी मोलाची भूमिका बजावणार आहे.
राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था (SIDM)
नागपूर येथे राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या (SIDM) इमारत बांधकामासाठी राज्य निधीमधून रुपये १८४ कोटींच्या निधीच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. ही संस्था राज्यातील सर्व घटकांसाठी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण देण्यासाठी आणि आपत्ती संबंधित विविध विषयावर संशोधन केंद्र म्हणून कार्य करेल.
जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्र
जागतिक बँकेच्या साहाय्याने महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रमांतर्गत ३४ जिल्ह्यांमध्ये (मुंबई शहर आणि मुंबई उपनगर वगळता) आणि ३ महानगरपालिका (सांगली-मिरज-कुपवाड, कोल्हापूर आणि इचलकरंजी) जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्रांचे (DEOC) आधुनिकीकरण करण्यात येत आहे. यामध्ये एकात्मिक आपत्कालीन व्यवस्थापन प्रणाली (IEMS), आपत्ती रेझिलियन्स नेटवर्क आणि ऑडिओ व्हिज्युअल आणि माहिती संप्रेषण आणि तंत्रज्ञान (ICT) घटकांचा समावेश असेल.ज्यामुळे जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्र हे राज्य आपत्कालीन कार्यकेंद्राशी अखंडपणे जोडले जातील, असे यावेळी सांगण्यात आले.
