गडचिरोलीत ‘उद्योजक मदत कक्ष’ – औद्योगिकीकरणाला नवी दिशा
गडचिरोली, दि.
औद्योगिकीकरणाच्या दिशेने गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाद्वारे महत्त्वपूर्ण पाऊल उचलत जिल्हाधिकारी कार्यालयात ‘उद्योजक मदत कक्ष’ स्थापन करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा उद्योग केंद्राच्या समन्वयाने कार्यरत असलेला हा कक्ष जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना देण्याबरोबरच नवउद्योजक, गुंतवणूकदार यांना ‘एक खिडकी’ प्रणालीद्वारे सर्वसमावेशक सेवा पुरवणार आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपुर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यात छत्तीसगड सीमेलगतच्या अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त कवंडे भागात आयोजित जनजागृती मेळाव्यात बोलतांना गडचिरोलीला नक्षलमुक्त व औद्योगिकदृष्ट्या सक्षम जिल्हा बनवण्याचा निर्धार व्यक्त केला होता.
*या कक्षाची प्रमुख उद्दिष्टे म्हणजे:*
गडचिरोलीत गुंतवणूक आकर्षित करणे, ‘सुलभ व्यवसाय व्यवस्था’ सुधारण्यात हातभार लावणे, तसेच पारदर्शक, उत्तरदायी व कार्यक्षम सेवांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वृद्धिंगत करणे. विशेषतः मागास व आदिवासी भागातील औद्योगिक विकासावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.
*मुख्य कार्य*
* विविध शासकीय परवाने, मंजुरी व प्रमाणपत्रांसाठी मदत करणारी ‘एक खिडकी प्रणाली’
* गुंतवणूकदारांच्या तक्रारी नोंदवून संबंधित विभागांशी समन्वय साधणे
* प्रकल्प नियोजन ते अंमलबजावणीपर्यंत मार्गदर्शन
* महाराष्ट्र उद्योग, व्यापार व गुंतवणूक सुलभता कक्ष, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांसारख्या राज्यस्तरीय संस्थांशी समन्वय
* उद्योजक मेळावे व गुंतवणूक संमेलनांचे आयोजन
या उपक्रमातून गुंतवणूकदारांमध्ये विश्वास निर्माण करणे, स्थानिक उद्योजकता आणि स्वयंरोजगारास चालना देणे , रोजगारनिर्मितीच्या माध्यमातून स्थलांतराचे प्रमाणही कमी करून मागास भागात समावेशक आर्थिक विकासास गती देण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या औद्योगिक धोरणाशी सुसंगत असलेला हा उपक्रम गडचिरोली जिल्ह्यास औद्योगिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल.