अवयवदान जनजागृती अभियानाचा राज्यात उद्या शुभारंभ
मुंबई, दि. ६ : राज्यातील अवयवदानाशी संबंधित समस्या सोडविणे आणि अवयवदानाबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीकोनातून वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग काम करणार आहे. राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात ‘अवयवदान जनजागृती अभियान’ उद्यापासून राबविण्यात येणार असल्याचे, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले.
“अवयवदानाबाबतची चळवळ यापूर्वी आपण राबविली होती. त्यावेळी अवयव दानाचे प्रमाण देखील सुधारले होते. परंतु नंतरच्या काळात कोरोनामुळे अवयव दानाची चळवळ मागे पडली. उद्यापासून पुन्हा एकदा राज्यभरात ‘अवयवदान जनजागृती अभियान’ची सुरुवात होईल आणि वर्षभरात वार्षिक उपक्रमांचे नियोजन केले जाईल. राज्यातील अवयवदानाशी संबंधित सर्व समस्या सोडविण्यासाठी आणि अधिकाधिक प्रमाणात जनजागृती करण्याच्या दृष्टीकोनातून अवयवदान जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. प्रत्येक नागरिकाला अवयवदानाच्या कार्यपद्धतीची चांगली माहिती देण्यात येईल आणि त्यांचे सर्व गैरसमज समाधानकारक आणि वैज्ञानिकदृष्ट्या दूर होतील,” असे मंत्री श्री. महाजन म्हणाले.
मंत्री श्री. महाजन म्हणाले की, सध्या भारतात शेवटच्या टप्प्यातील मूत्रपिंड आणि यकृताच्या आजारांच्या उपचारांसाठी २ लाख मूत्रपिंड आणि १ लाख यकृताची गरज आहे, मात्र दरवर्षी केवळ ४ हजार मूत्रपिंड प्रत्यारोपण आणि ५०० यकृत प्रत्यारोपण केले जाते. पाच हजार रुग्णांना हृदयाची गरज असून केवळ २० ते ३० हृदय प्रत्यारोपण केले जात आहे. आज अवयव मिळत नसल्याने मूत्रपिंड प्रत्यारोपण व यकृत प्रत्यारोपण करण्याकरिता बरीच प्रतीक्षा यादी आहे. एक ब्रेन डेड रुग्णांमुळे सात अवयव गरजू रुग्णाचे जीव वाचू शकतात. परंतु ब्रेन डेड रुग्णाच्या नातेवाईकाकडून गैरसमजामुळे अवयव दान करण्यात येत नाही. अवयव दान चळवळीमधून हा गैरसमज दूर केल्यास अवयव दानाचे प्रमाण नक्कीच सुधारेल. अवयव निकामी झालेल्या रुग्णास अवयव मिळाल्यानंतर केवळ त्याचाच जीव वाचत नाही तर त्यावर अवलंबून असलेल्या संपूर्ण कुटुंब पूर्ववत होते. त्याकरिता अवयव दानाची मोठ्या प्रमाणात चळवळ उभी राहणे आवश्यक आहे व त्यातून अवयवदान प्रमाण वाढणे आवश्यक आहे. त्याकरिता आपण अवयव दानाची चळवळ पुनश्च पूर्वीप्रमाणेच जोमाने सुरू करीत आहोत.
अवयवदान केल्यानंतर देखील त्या अवयवाचे तत्काळ प्रत्यारोपण करणे देखील तेवढेच आवश्यक असते. त्याकरिता सर्वत्र अवयव प्रत्यारोपणाच्या सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. त्याकरिता अवयव प्रत्यारोपण बाबतची सुविधा सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित रुग्णालयामध्ये उपलब्ध करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
या अभियानाच्या माध्यमातून नॉनट्रान्सप्लांट ऑर्गन सेंटरची संख्या वाढवून गरीब व गरजू रुग्णांसाठी शासकीय संस्थांमध्ये परवडणाऱ्या प्रत्यारोपण सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रत्येक शासकीय संस्थेत अवयवदान जनजागृती अधिकारी यंत्रणा समाविष्ट करून विद्यमान रुग्णालयांचे बळकटीकरण करण्याचे नियोजन आहे. आधीच उपलब्ध असलेल्या सरकारी योजनांमध्ये समावेश करून तसेच त्यासाठी आर्थिक देणगीदारांचा पूल तयार करून प्रत्यारोपणाच्या आर्थिक ओझ्यावर मात करण्यासाठी राज्य शासनामार्फत उपाय शोधले जात असल्याचे मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.
वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव डॉ. अश्विनी जोशी, वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.दिलीप म्हैसेकर, सहसंचालक डॉ. विवेक पाखमोडे, डॉ. मिलिंद फुलपाटील, डॉ. अजय चंदनवाले यांच्या नेतृत्वात अवयवदान जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाचे राज्यस्तरीय समन्वयक डॉ. हरीश ताटिया, डॉ. योगेश गवळी व डॉ. राकेश वाघमारे करणार आहेत.