महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती
मुंबई, दि. २६ : महाराष्ट्र जमीन महसूल नियम, २०१९ मध्ये सुधारणा करून भोगवटादार वर्ग-२ आणि भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटादार वर्ग-१ रूपांतरीत करताना आकारावयाच्या सवलतीच्या दरातील कालावधीला मुदतवाढ देण्याचा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे जनतेला याचा निश्चितच फायदा होईल, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली
राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. या बैठकीमध्ये भोगवटादार वर्ग-२ आणि भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटादार वर्ग-१ मध्ये रूपांतरीत करताना आकारण्यात येणाऱ्या सवलतीच्या दर कालावधीस मुदतवाढ देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्रीमंडळ बैठकीत एकमताने घेण्यात आला आहे. यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल नियम, २०१९ मध्ये सुधारणा करून राज्यमंत्री मंडळाने दि. ०७ मार्च, २०२४ पर्यंतची मुदतवाढ दिली असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.