तहसीलदार चेतन पाटील यांचे आवाहन
मुलचेरा:तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीची मदत मिळवण्यासाठी गावातील तलाठ्याकडून विशिष्ट क्रमांक मिळवून घेत ई-केवायसी करून घेणे अनिवार्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तत्काळ आपल्या खात्याची ई-केवायसी करुन घ्यावी, असे आवाहन मुलचेराचे तहसीलदार चेतन पाटील यांनी केले आहे.
ऑक्टोबर-नोव्हेबर २०२१ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक व कृषी साहाय्यक यांची त्रिस्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती. या त्रिस्तरीय समितीमार्फत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते. मुलचेरा तालुक्यात ऑक्टोबर २०२१ मध्ये एकूण ८७ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान, तसेच नोव्हेंबर-२०२१ मध्ये ५४३ शेतकऱ्यांचे असे एकूण ६२९ लाभार्थ्याच्या पिकाचे नुकसान झालेले आहे. तलाठ्याकडून शेतकऱ्यांनी विशिष्ट क्रमांकासह लवकरात लवकर ई-केवायसी करून घेण्याची कार्यवाही करुन घ्यावी.
तहसिल कार्यालयाकडून तलाठ्यामार्फत संबंधित ग्रामपंचायतीमध्ये विशिष्ट क्रमांक याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. बाधित शेतकऱ्यांनी तत्काळ जवळच्या आपले सरकार सेवा केद्रांवर जाऊन ई-केवायसी करुन घ्यावी. त्यानंतरच आपल्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये नुकसानभरपाई रक्कम जमा होईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहन मुलचेराचे तहसिलदार चेतन पाटील यांनी केले आहे.