ठाणे, दि. १३ (जिमाका) : मुंब्रा येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वरील वाय जंक्शन येथे एमएमआरडीएने उभारलेल्या उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. या उड्डाणपुलामुळे हजारो वाहनांना आणि लाखो प्रवाशांना फायदा होणार असून प्रत्येक फेरीला त्यांच्या वेळेत सुमारे ३० मिनिटांची बचत होणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
एमएमआरडीएच्या वतीने मुंब्रामधील राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वरील वाय जंक्शन येथील उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड, एमएमआरडीए आयुक्त एसव्हीआर श्रीनिवासन
आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले “एमएमआरडीएच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या या उड्डाणपुलाचा हजारो वाहनांना आणि लाखो प्रवाशांना फायदा होणार असून प्रत्येक फेरीला त्यांच्या वेळेत सुमारे ३० मिनिटांची बचत होणार आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्याचे रुंदीकरण व सुधारीकरण करण्याचे काम देखील लवकर सुरू होईल ज्यामुळे या भागातील नागरिकांना उत्तम दर्जाचे रस्ते मिळतील तसेच इतर विकास कामामुळे आयुष्य सुखकर होईल.
महानगर आयुक्त श्री. श्रीनिवास म्हणाले, “या प्रकल्पामुळे लाखो लोकांना फायदा होईल. यामुळे मनुष्याचे तास कमी होतील, रहदारी कमी होईल, जेएनपीटी आणि गुजरातकडे जाणारी वाहतूक सुलभ होईल. मुंब्रा वाय जंक्शन प्रकल्पाने बाधित झालेल्या एकूण ८८६ प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन प्राधिकरणामार्फत करण्यात आले आहे.
प्रकल्पाची माहिती
राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ हा ठाणे जिल्ह्याच्या शहरी भागातील एक महत्त्वाचा रस्ता आहे. हा महामार्ग मुंब्रा वाय जंक्शन, शिळफाटा – कल्याण फाटा जंक्शन या भागातून जात असल्यामुळे त्या भागाचा विकास होत आहे. मुंब्रा वाय जंक्शनवरील एमएमआरडीएने बांधलेल्या ३+३ अशा दुहेरी मार्गिकेच्या या उड्डाणपुलामुळे जेएनपीटीकडून येणारी अवजड वाहतूक आणि गुजरातकडे जाणारी वाहतूक विभक्त करते. त्यामुळे जेएनपीटी आणि गुजरातच्या सीमेवरून येणार्या अवजड कंटेनरच्या वाहतुकीसाठी हा उड्डाणपूल उपयुक्त ठरेल. तसेच मुंब्रा शहरातून येणाऱ्या स्थानिक वाहतुकीमुळे होणारी गर्दीदेखील टळेल.
विस्तारीत मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत पुलाचे बांधकाम
शिळफाटा, डोंबिवली/ कल्याण या भागांमधील विकासकामांमुळे निवासी संकुलामध्ये नागरी वाढ लक्षात घेता हा प्रकल्प ठरेल फायदेशीर. सदर प्रकल्पामध्ये रस्ता रुंदीकरणासह उड्डाणपूलाच्या बांधकामाचा अंतर्भाव आहे. सदर उड्डाणपुलाची एकूण लांबी पोहाचमार्गासह ८२० मी. असून रुंदी २४.२० मीटर (३+३ मार्गिका) इतकी आहे.
