उपजिल्हा रुग्णालयात जाऊन मंडल कुटुंबियांची घेतली भेट!
अहेरी: तालुक्यातील चिंतलपेठ येथील सुषमा देवदास मंडल या महिलेला वाघाच्या हल्ल्यात जीव गमवावा लागला ही अत्यंत दुःखद घटना असून यानंतर असे दुःखद घटना टाळण्यासाठी वन विभागाने त्या नरभक्षक वाघाला त्वरित जेरबंद करावी अशी मागणी माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम केली आहे.
चिंतलपेठ येथे आज सकाळच्या सुमारास घडलेल्या घटनांमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाला होता. एवढेच नव्हे तर सध्या शेतीचे काम सुरू असून या परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे त्यामुळे पुढे या भागातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे.शेतीचे कामे खोळंबणार असून याचा फटका थेट सर्वसाधारण शेतकऱ्यांना बसणार आहे. त्यामुळे वनविभागाने या गंभीर घटनेची दखल घेऊन त्वरित त्या नरभक्षक वाघाला जेर बंद करावा अशी मागणी त्यांनी वन विभागाकडे केली आहे.
दरम्यान शवविच्छेदनासाठी मृतदेह अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालय येथे आणले असता राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी मंडल कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन करत धीर दिला.उपस्थित वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून सदर घटनेची माहिती घेऊन प्रस्ताव तयार करून वारसांना त्वरित अर्थसाहाय्य द्यावे अशी मागणी केली.
थेट फोन करून दिले निर्देश
उपजिल्हा रुग्णालय येथे परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी थेट उपवनसंरक्षक यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. एवढेच नव्हे तर जिल्ह्यात घडणाऱ्या वन्य प्राण्यांच्या घटनेमुळे अनेकांना यात जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन यावर उपाययोजना करण्यासाठी विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वन विभागाची तात्पुरती मदत
वन विभागातर्फे सध्या तात्पुरत्या स्वरूपात मंडल कुटुंबियांना तीस हजार रुपयांची मदत करण्यात आली. यावेळी ही रक्कम माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते देण्यात आली.!