ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

नाव, जन्मतारीख व धर्मामध्ये बदल करण्यासाठी (गॅझेट) राजपत्र नोंदणी अर्ज करा ऑनलाईन

गेली अनेक वर्षे सरकारी गॅझेटमध्ये नाव, जन्मतारीख, धर्म किंवा अन्य कोणताही बदल करायचा असेल तर सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत होते. सरकारी कार्यालयातील फॉर्म, शुल्क भरणे आणि ही प्रक्रिया अर्जंट व्हायला हवी असेल तर त्यासाठीचे जादा शुल्क भरणे आवश्यक होते. आता गॅझेटमधील नावनोंदणीची सुविधा ऑनलाईन करून देण्यात आली आहे.

ही ऑनलाईन राजपत्राची पद्धती काही वर्षांपासून सुरू असली तरी अनेकांची माहितीअभावी धावपळ होते. काहीजण नावातील अथवा जन्मतारीख, धर्म बदल यासाठी वृत्तपत्रातून जाहिरात प्रसिद्ध करतात. ही बाब खर्चिक असून, तिला शासकीय मान्यता नाही. महाराष्ट्र शासनाचा नाव, वय, धर्म बदलण्याच्या जाहिरातींचा स्वतंत्र ‘भाग दोन’ विभाग असून, हा बदल अधिकृतपणे राज्य शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येतो. पूर्वी नाव बदलण्याची प्रक्रिया ही किचकट होती, ऑनलाईन राजपत्रामुळे ती अतिशय सोपी व सहज झाली आहे.

राजपत्रात कोणता बदल नोंदविता येतो?

जन्मतारीख, नाव, धर्म यातील बदल राजपत्रात अधिकृतपणे नोंदविता येतो. विवाहित व नोकरीतील महिला यांच्या नावातील बदल, नावातील काही किरकोळ चुकांची सुधारणा, अलीकडे पूर्ण नावामध्ये आईचे नाव लिहिण्याची पद्धत आली असून, काही हौसी नाव तर कुठे आडनावापुढे ‘पाटील’, नावापुढे ‘साहेब’, दत्तविधानातील नाव बदल राजपत्रात नोंदविता येतात.

राजपत्रासाठी आवश्‍यक कागदपत्रे

आवश्‍यक नाव, जन्मतारीख, धर्म बदलासाठी वेबसाइटवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो. यासाठी आधार कार्ड/पॅनकार्ड/ड्रायविंग लायसन्स/मतदान कार्ड/पासपोर्ट/लाईटबील/रेशन कार्ड, एक पासपोर्ट फोटो, शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र, लग्नपत्रिका, दत्तकपत्र, जन्मनोंद, नावाच्या दुरुस्तीबाबत कागदपत्रे, नावातील चुकांची दुरुस्ती आदी कागदपत्रांची बदलानुसार आवश्‍यकता आहे. ऑनलाईन अर्ज व शुल्क भरल्यानंतर किमान 15 दिवसांच्या कालावधीत राजपत्रात बदल प्रसिद्ध करण्यात येतो.

नावात बदल/जन्मतारखेमध्ये बदल किंवा धर्म बदलण्यासाठी सर्व संबंधित सूचना वाचा.

१. ही नोटीस भरण्यापूर्वी सूचनांचे काळजीपूर्वक पालन करण्यात यावे. नोटीस फक्त युनिकोड फॉन्टमध्येच भरण्यात यावी. नोटिशीच्या पहिल्या पृष्ठावर प्रत्येक रिकाम्या जागेत केवळ एक शब्द लिहिण्यात यावा, शासन, नोटिशीच्या आशयाच्या अधिप्रमाणतेबाबत कोणतीही जबाबदारी स्वीकारणार नाही. म्हणून ते कागदपत्रांची पडताळणी न करता संबंधित व्यक्तीच्या अर्जावर पूर्णपणे अवलंबून असतील. नोटीस केवळ इंग्रजी किंवा मराठी भाषेत भरण्यात यावी.

२. नाव, धर्म किंवा जन्म दिनांक यांच्या बदलासंबंधातील अधिसूचनेच्या “महाराष्ट्र शासन राजपत्र” याची प्रसिद्धी शासकीय किंवा इतर अभिलेखांमध्ये बदललेले नाव, धर्म किंवा जन्मदिनांक असलेल्या संबंधित व्यक्तीला कोणताही हक्क प्रदान करत नाही. त्याचप्रमाणे जर कोणत्याही अनधिकृत व्यक्तीने नाव, धर्म किंवा जन्मदिनांक बदलण्यासाठी नोटीस दिली असेल तर शासन त्याची कोणतीही जबाबदारी घेणार नाही म्हणजे अशा नोटिशीची प्रसिद्धी ही जाहिरात असेल मात्र अशा प्रकारे बदललेले नाव, धर्म किंवा जन्मदिनांक याचा अधिप्रमाणित अभिलेख किंवा पुरावा असणार नाही.

३.नागरीक त्याच्या/तिच्या स्वतःच्या जबाबदारीवर या कार्यालयाच्या “dgps.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नोटिशीचा तपशील भरतील आणि अपलोड करतील म्हणून अपलोड केलेल्या नोटिशीमध्ये कोणतीही दुरुस्ती करण्याची अनुमती असणार नाही. नाव, धर्म किंवा जन्म दिनांक यांच्या बदलाच्या अचूकपणाची, नोटिशीची सुनिश्चिती करण्यासाठी दिलेल्या जागी किंवा ठिकाणावर योग्यरित्या व पूर्णपणे ती भरण्यात यावी. हे कार्यालय, कोणत्याही चूकीसाठी जबाबदार राहणार नाही. दर्शनी धनाकर्ष/ धनप्रेष सोबत संगणकामार्फत न आलेल्या नोटिशी, ऑफलाईन स्वीकारल्या जाणार नाहीत. नाव, धर्म आणि जन्म दिनांक यांतील बदलासंबंधित नोटिशी भरण्याची आणि अपलोड करण्याची सुविधा संगणकावर (ऑनलाईन) पुरविण्यात आली आहे. म्हणून नागरिकांनी नोटीस भरण्यासाठी आणि प्रसिद्ध केलेले राजपत्र घेण्यासाठी देखील शासकीय पंचागार, मुंबई येथील खिडकीस भेट देण्याची गरज नाही. प्रसिद्ध केलेल्या राजपत्राच्या प्रती टपालाद्वारे पाठवण्यात येत नाहीत तर नागरिकांना त्या प्रसिद्ध केलेल्या प्रती वर नमूद केलेल्या संकेतस्थळावरून डाऊनलोड) उतरवून घेता येतील.

४. नागरिकांनी ऑनलाईन नोटीसमधील पूर्ण तपशील भरावा आणि त्याची मुद्रित प्रत घ्यावी जुन्या आणि नवीन नावाने स्वाक्षरी करून स्वाक्षरित नोटीस अपलोड करावी. नोटिशीसोबत आधारकार्ड, मतदार ओळखपत्र, पारपत्र, पॅनकार्ड, वाहन चालक अनुज्ञप्ती, यांसारखी छायाचित्र ओळख पुरावा असलेली क्रमविक्षित (स्कॅन) प्रत अपलोड करणे अनिवार्य आहे. नागरिकांनी नाव, धर्म आणि जन्म दिनांक बदलासंबंधीच्या नोटिशीमध्ये नमूद केलेल्या कारणांनुसार संबंधित क्रमविक्षित (स्कॅन केलेले कायदेशीर दस्ताऐवजदेखील अपलोड करावे.

५. निरक्षर व्यक्तींनी पूर्णपणे भरलेल्या ऑनलाईन नोटिशीची मुद्रित प्रत काढून त्यावर आपल्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा उमटवावा आणि मग ते अपलोड करावे.

६. अज्ञान व्यक्तींच्या बाबतीत (१८ वर्षांखालील), अर्जदाराचे पालक/आई किंवा वडील यांनी पूर्णपणे भरलेल्या ऑनलाईन नोटिशीच्या मुद्रित प्रतीवर प्रतिस्वाक्षरी करावी आणि ते अपलोड करावे. पालकाचे आधारकार्ड, मतदार ओळखपत्र, पारपत्र, पॅनकार्ड, वाहनचालक अनुज्ञप्ती आणि अर्जदाराचे जन्म प्रमाणपत्र यांसारख्या छायाचित्र ओळखपत्र पुराव्यांपैकी एका पुराव्याचे क्रमविक्षण (स्कॅन) करून नोटिशीसह अपलोड करणे अनिवार्य आहे.

७. सर्वसाधारण नोटिशीसाठी शुल्क – नाव, धर्म व जन्म दिनांक यामध्ये बदल करण्यासाठी सर्वसाधारण नोटिशीचे रु. ५०० अधिक महाऑनलाईनचे शुल्क रु. २० आणि अधिकचा सेवाकर असे शुल्क आहेत. मागासवर्गीय अर्जदाराकरिता रुपये २५० अधिक महाऑनलाईनचे शुल्क रु. २० आणि अधिकचा सेवाकर असे शुल्क आहेत. नोटिशीचे शुल्क नावे पत्र (डेबीट कार्ड), पत पत्र (क्रेडिट कार्ड), नेट बँकिंग यंत्रणा किंवा सीएससी केंद्रांत रोख भरून यांसारख्या माध्यमाद्वारे केवळ ई – प्रदान करून भरणा करावा.

८. मागासवर्ग/अनुसूचित जातीच्या अर्जदारास संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याने/तहसीलदाराने जुन्या नावाने जारी केलेल्या जात प्रमाणपत्राची साक्षांकित क्रमविक्षित (स्कॅन) प्रत अपलोड करता येईल. [(१) अनुसूचित जमाती (२) विमुक्त जमाती, (३) भटक्या जमाती, (४) नवबौद्ध, (५) विदर्भाच्या विनिर्दिष्ट क्षेत्रांबाहेरील आदिवासी आणि (६) अनुसूचित जाती, (७) मागासवर्गात समाविष्ट करण्यात आलेले इतर विशेष मागास वर्ग इतर मागासवर्गीयांचा या सवलतीसाठी विचार करण्यात येणार नाही. अज्ञान व्यक्तीच्या बाबतीत (१८ वर्षांपेक्षा कमी) मागासवर्गीय/अनुसूचित जातीच्या अर्जदारांस संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याने/ तहसीलदाराने अर्जदारांच्या वडिलांच्या जुन्या नावाने जारी केलेल्या जात प्रमाणपत्राची साक्षांकित क्रमविक्षित (स्कॅन) प्रत अपलोड करता येईल.

९. महाराष्ट्र शासन राजपत्रात सर्वसाधारण जाहिरात प्रसिद्ध होण्यासाठी सामान्यतः १० ते १५ दिवसांच्या कालावधीची आवश्यकता असते. संबंधित अर्जदाराला त्यांच्या नोटिशीच्या स्थिती संबंधात लघुसंदेश (एसएमएस) पाठविण्यात येतो.

१०. जात किंवा पोट जात मधील बदलासंबंधात कोणतीही जाहिरात महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार नाहीत.

११. मृत व्यक्तींच्या नावातील बदलांसंबंधात कोणतीही जाहिरात महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार नाहीत.