मुंबई, दि. 17 : राज्याच्या वस्तू व सेवाकर विभागाने विशेष तपास मोहिमेंतर्गत पुण्यात मोठी कारवाई केली आहे. या तपास मोहिमेत एका व्यक्तीला 630 कोटी रुपयांच्या बनावट पावत्याद्वारे 110 कोटी रुपयांची बनावट कर क्रेडिट वापरुन पास केल्याप्रकरणी अटक केल्याची माहिती, राज्यकर सहआयुक्त, पुणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
महाराष्ट्र वस्तू आणि सेवाकर विभागाने कर चुकविणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात राबविण्यात आलेल्या विशेष तपास मोहिमेंतर्गत पुण्यातील मेसर्स अग्रवाल एंटरप्रायझेस आणि इतर कंपन्यांच्या बाबतीत तपासणी करण्यात आली. या तपासात रामनारायण बरुमल अग्रवाल (वय-62) हे तब्बल 26 बोगस कंपन्या तयार करण्यात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. या कंपन्यांनी 56 कोटी 34 लाखांचे बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) घेतले आहे आणि 54 कोटी 64 लाखांचे बनावट कर क्रेडिट वस्तू किंवा सेवांचा प्रत्यक्ष पुरवठा न करता पास करुन वस्तू आणि सेवाकर विभागाची फसवणूक केली.
या प्रकरणात बनावट करदात्यांकडून खरेदी इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा केला गेला आणि महाराष्ट्र वस्तू आणि सेवाकर कायदा 2017 च्या तरतुदींचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे वस्तू आणि सेवाकर विभागाने 16 नोव्हेंबर 2022 रोजी रामनारायण बरुमल अग्रवाल यांना अटक केली आहे. या व्यक्तीला मुख्य न्यायदंडाधिकारी, पुणे यांनी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याची माहिती, विभागाने दिली आहे.
पुणे-2 क्षेत्राचे राज्यकर सहआयुक्त दीपक भंडारे यांच्या नेतृत्वाखाली ही अटकेची कारवाई करण्यात आली. राज्यकर उपायुक्त सुधीर चेके यांच्या देखरेखीखाली आणि सहायक राज्यकर आयुक्त श्रीकांत खाडे, रुषिकेश अहिवळे, प्रदीप कुलकर्णी यांच्यासह राज्यकर निरीक्षकांनी ही कारवाई पूर्ण केली. पुणे विभागाचे अप्पर राज्यकर आयुक्त धनंजय आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अटकेची संपूर्ण कारवाई करण्यात आली असल्याची माहिती, राज्यकर सहआयुक्तांनी दिली.