ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

प्रत्येक गरजू व्यक्तीचे स्वत:चे घर असण्याची स्वप्नपूर्ती करण्यासाठी शासन कटिबध्द – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, दि.२७ (जिमाका) : स्वतःचे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते, ते चांगल्या दर्जाचे असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते, ते आज पूर्ण होत आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते 40 लाख गरिबांना घरे देणे, त्यातून एसआरए योजना सुरू झाली. याच माध्यमातून प्रत्येक गरजू व्यक्तीचे स्वत:चे घर असण्याची स्वप्नपूर्ती करण्यासाठी हे शासन कटिबध्द आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मार्फत झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत अंतिम भूखंड क्रमांक ३७७ मौजे पाचपाखाडी, चंदनवाडी, पाठक इस्टेट, ठाणे श्री.जगन्नाथ (एसआरए) सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित येथील झोपडपट्टी लाभार्थ्यांकरिता सदनिकेच्या चाव्यांचे वाटप कार्यक्रम संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.


यावेळी आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, ठाणे चे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, नरेश म्हस्के व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, महानगर प्रदेश प्राधिकरण (MMR) चे ठाणे कार्यालय स्वतंत्र केल्याने ठाण्यातील गरजूंना लवकर घरे मिळतील. संपूर्ण एमएमआर क्षेत्रात झोपडपट्टी पुनर्वसन ही योजना सुरू करण्यात आली आहे. शासनाने लोकांच्या हितासाठी या योजनेतील काही नियमांमध्ये बदल केले. शासनाची महत्वाकांक्षी क्लस्टर योजना ठाण्यात सुरू करण्यात आली असून 10 हजार घरांच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू करीत आहोत. नियम-कायदे लोकांच्या भल्यासाठी हवेत, हे शासन त्यासाठीच काम करीत आहे. प्रत्येक गरजू व्यक्तीच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी हे शासन प्रयत्नशील आहे.


ते पुढे म्हणाले, श्री.जगन्नाथ (एसआरए) सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित या प्रकल्पात 400 घरे, 100 दुकाने आहेत. याशिवाय व्यायामशाळा, बालवाडी, ग्रंथालय अशा विविध सुविधाही आहेत. या उत्तम दर्जाच्या सुविधांसह उभ्या राहिलेल्या या प्रकल्पाची निगा राहणे, येथील परिसर स्वच्छ ठेवणे, ही येथील सर्वांची जबाबदारी आहे. वातावरण चांगले ठेवले की सर्वच चांगले होते. समरीन ग्रुप ने वेळेत काम पूर्ण केल्याबद्दल या प्रकल्पाचे विकासक श्री. मुश्ताक शेख यांचे अभिनंदन करुन मुंबई-ठाणे शहरातील रखडलेल्या इतर प्रकल्पांचेही काम पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शेवटी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री. जगन्नाथ (एसआरए) सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित,ठाणे या संस्थेच्या सभासदांना प्रातिनिधिक स्वरूपात सदनिकेच्या चाव्यांचे वितरण करण्यात आले.