गडचिरोली, दि. २४ एप्रिल – जलव्यवस्थापन कृति पंधरवडा २०२५ अंतर्गत कोटगल (ता. गडचिरोली) व हल्दीपुरानी (ता. चामोर्शी) उपसा सिंचन योजनांच्या लाभक्षेत्रातील पाणी वापर संस्थांसाठी चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांचे आयोजन नाबार्ड व पाटबंधारे विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
कोटगल सिंचन योजनेच्या कार्यक्रमात ८ पाणी वापर संस्थांचे अध्यक्ष, सचिव व सदस्य यांच्यासमवेत समाधान व तक्रार निवारण, क्रॉप पॅटर्न, प्रायोगिक तत्त्वावर अवोकाडो, स्ट्रॉबेरी, ऊस व भुईमूगसारखे नगदी पीक लागवड, तसेच पाण्याचा काटकसरीने उपयोग यावर सखोल चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल मोरघडे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी नारायण पौनीकर, उपविभागीय अभियंता गणेश परदेशी व विविध पाणी वापर संस्थांचे प्रतिनिधी, तसेच पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
त्याचप्रमाणे, हल्दीपुरानी सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रात अड्याळ (ता. चामोर्शी) येथे गट ग्रामपंचायत कार्यालयात मार्गदर्शन सत्र घेण्यात आले. यामध्ये जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी व पाटबंधारे विभागाच्या संयुक्त पुढाकाराने पाणी वापर संस्थांना आधुनिक शेती पद्धती, क्रॉप पॅटर्न, व जलसंधारण विषयक माहिती देण्यात आली. या सत्रात कृषी मंडळ अधिकारी श्री. वळवी, श्री. गणेश परदेशी, सरपंच कु. स्वाती टेकाम, व कृष्ठापुर पाणी वापर संस्थेचे प्रतिनिधी व पाटबंधारे विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते.
