ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

राज्यातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी; हेल्थ कार्ड आणि हेल्थ ॲपची महत्त्वाची घोषणा, मुख्याध्यापकांवर मोठी जबाबदारी

मुख्याध्यापकांना प्रत्येक विद्यार्थी तपासणीसाठी हजर राहील याची खबरदारी घ्यावी लागणार आहे. तसेच, तपासणीनंतर गरजूंना पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्याचे नियोजन शाळांनी स्थानिक आरोग्य यंत्रणेशी समन्वय साधून करावे लागेल. सर्व तपासण्या सुरक्षित व अद्ययावत यंत्रसामग्रीच्या सहाय्याने करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी शासनाची ही पाऊले मैलाचा दगड ठरणार आहेत.

राज्यातील सर्व शासकीय, अनुदानित तसेच अंगणवाड्यांतील ० ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करून ‘हेल्थ कार्ड’ आणि ‘हेल्थ ॲप’च्या माध्यमातून आरोग्य नोंदी करण्यात येणार आहेत. तपासणीदरम्यान कोणताही गंभीर आजार अथवा व्यंग आढळल्यास मोफत उपचार आणि गरज असल्यास शस्त्रक्रिया करण्याचीही तरतूद करण्यात आली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जानेवारी २०२४ मध्ये झालेल्या बैठकीत या महत्त्वाकांक्षी निर्णयास मंजुरी मिळाली होती.
या तपासणी कार्यक्रमांतर्गत ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम’ राबवला जाणार असून, यात ४-डी म्हणजेच डिफेक्ट्स ( त्रुटी ), डेफिशियन्सी, डेव्हलपमेंटल डिलेज आणि डीसिज यांच्यावर विशेष भर दिला जाणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची आरोग्य तपासणी ‘हेल्थ ॲप’मध्ये ऑनलाइन अपलोड केली जाईल. तपासणीसाठी दोन डॉक्टर, एक नर्स व एक आरोग्य सहायिका असे पथक दरमहा शाळांना भेट देणार आहेत.

विशेष म्हणजे, गंभीर स्थितीतील विद्यार्थ्यांना केंद्र सरकारमान्य १०४ प्रकारच्या शस्त्रक्रिया तातडीने आणि मोफत करण्यात येणार आहेत. या सेवेसाठी विमा कंपन्यांचा सहभाग न घेता थेट ॲश्युअरन्स मोड अंतर्गत राज्य आरोग्य हमी सोसायटीमार्फत उपचार उपलब्ध करून देण्यात येतील.

यासाठी याआधीच नंदुरबार, गडचिरोली, उस्मानाबाद, ठाणे, बीड, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये विशेष समित्या तयार झाल्या आहेत. त्याच धर्तीवर आता उर्वरीत जिल्ह्यांमध्येही समित्या स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तसेच प्रत्येक आणि जिल्हा स्तरावर तपासणीचे वेळापत्रक बनवून त्यानुसार अंमलबजावणी केली जाईल.

मुख्याध्यापकांवर जबाबदारी –