गडचिरोली : पुणे जिल्ह्यातील आळंदी व ठाणे जिल्ह्यातील खडवली येथील बेकायदेशीर बालगृहे, वसतीगृहे व अनाथाश्रमांविषयी वृत्तपत्रांमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संस्थांमध्ये बालकांना अनधिकृतपणे ठेवून त्यांच्यावर शारिरीक, मानसिक व लैंगिक शोषण होत असल्याच्या घटना उजेडात आल्या आहेत.
ही बाब अत्यंत गंभीर असून, बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 व सुधारित अधिनियम 2021 तसेच महाराष्ट्र राज्य बाल न्याय नियम 2018 यांचे सरळ उल्लंघन करणारी आहे. अधिनियमाच्या कलम 42 नुसार नोंदणी नसलेल्या संस्थांचा किंवा व्यक्तीचा दोष सिद्ध झाल्यास एक वर्षापर्यंत कारावास व रु. 1 लाखांपर्यंतचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
या पार्श्वभूमीवर, महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांनी जनतेस आवाहन केले आहे की, गडचिरोली जिल्ह्यात आपल्या परिसरात अशा अनधिकृत संस्था आढळल्यास तत्काळ जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी किंवा चाईल्ड हेल्पलाइन टोल फ्री क्रमांक 1098 वर संपर्क साधावा. बालकांवरील अन्याय आणि शोषण रोखण्यासाठी ही बाब अत्यावश्यक असून नागरिकांनी जागरूक राहून प्रशासनास सहकार्य करावे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
