मुंबई, दि. १९ : ‘सरकार आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला जनता दरबार कार्यक्रमात १५०० तक्रारी आज दाखल झाल्या असून २०० अर्जदार महिलांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून आपल्या समस्या महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीमध्ये मांडल्या. स्थानिक प्रशासनाने १५०० तक्रारी पडताळून घेऊन यावर तातडीने कार्यवाही करावी, ज्या महिलांना रोजगाराची आवश्यकता आहे त्यांना रोजगार मार्गदर्शन करावे तसेच निराधार महिलांना संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून लाभ देता येतो ही माहिती द्यावी, अशा सूचना महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिल्या.
ग्रँट रोड येथील मुंबई महापालिकेच्या ‘डी वॉर्ड’ मध्ये सरकार आपल्या दारी उपक्रमांतर्गत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला जनता दरबार कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात मंत्री श्री.लोढा बोलत होते.
यावेळी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आशिष शर्मा, सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा गोरे, परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त डॉ.अभिनव देशमुख, मुंबई महापालिकेच्या उपायुक्त डॉ.संगीता हसणाळे, डी वॉर्डचे सहायक आयुक्त शरद उघडे यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
मंत्री श्री.लोढा म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे “सशक्त नारी-समृद्ध भारत” हे स्वप्न साकार करण्यासाठी महिला बालविकास विभागांतर्गत ‘सरकार आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू केला आहे. आलेल्या तक्रार अर्जांवर १५ दिवसात सर्व विभागांनी कार्यवाही करावी. पावसाळ्यापूर्वी मुंबई उपनगर परिसरामधील स्वच्छतेच्या अनुषंगाने सर्व कामे करावीत. म्हाडाच्या इमारतींच्या पुनर्विकासाबाबत महानगरपालिका आणि म्हाडा यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती पर कार्यशाळा आयोजित करणार असून अनेक ठिकाणी अवैध धंद्यांना आळा बसावा यासाठी पोलिसांनी गस्त घालणे गरजेचे आहे जेणेकरून महिलांना सुरक्षित वातावरण मिळणे शक्य होईल.
वाहतूक समस्या, पिण्याच्या पाण्याची समस्या, शाळेतील प्रवेश, आरोग्य सुविधा, सार्वजनिक ठिकाणी कचरा करणाऱ्यावर कारवाई करावी, कचरा पेटीची व्यवस्था, ड्रेनेजची पाइप लाईन फुटली आहे अशा तक्रारींवर प्रत्येक स्थानिक प्रशासनाने कार्यवाही करावी. काही सहकारी गृहनिर्माण संस्थांना मुंबई महानगर पालिकेकडून वेळेत पाणी मिळत नाही. आजूबाजूला असणाऱ्या सहकारी गृहनिर्माण संस्था सार्वजनिक ठिकाणी मोटार लावतात अशा गृहनिर्माण संस्थांवर कारवाई करावी.
सरकार आपल्या दारी अभिनव उपक्रम : अनुराधा गोरे
महिलांना आपल्या समस्या मांडण्यासाठी ‘सरकार आपल्या दारी’ हा अभिनव उपक्रम असून तो मुंबई शहर आणि उपनगरमध्ये सर्वत्र राबवावा, असे मत सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा गोरे यांनी व्यक्त केले.
यावेळी २५० महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. ‘डी वॉर्ड’ येथे बँका आणि महिला आर्थिक विकास महामंडळ आणि विविध विभागांचे 20 स्टॉल लावण्यात आले होते. तसेच शासनाच्या विविध विभागांकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देणारे स्टॉलही लावण्यात आले होते. महिला व बचत गटांची नोंदणी प्रक्रिया याचीही माहिती महिलांना देण्यात आली. यावेळी उत्कृष्ट काम करणाऱ्या मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांचा मंत्री श्री. लोढा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
३१ मे २०२३ पर्यंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला जनता दरबार
महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई महानगरपालिका आणि एकात्मिक बालविकास योजना आयुक्त यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सरकार आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला जनता दरबार राबविण्यात येत आहे. या उपक्रमात महिलांना तक्रारीसाठी प्रत्येक वॉर्डमध्ये ऑनलाईन अर्जही करता येणार आहे. हा उपक्रम दि. १९ एप्रिल पासून ३१ मे २०२३ पर्यंत दुपारी ३ ते ५.३० या वेळेत सूरू राहणार आहे. अधिक माहिती व अर्ज भरण्यासाठी https://forms.gle/7GzCSACLYsj38amq9 या लिंकचा वापर करावा.