ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मुंबई उपनगर जिल्ह्यातील बालकांसाठी तातडीने गोवर लसीकरण मोहीम राबवा – पालकमंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि. 15 : मुंबई उपनगर जिल्ह्यातील बालकांसाठी तातडीने गोवर लसीकरण मोहीम राबविण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.

हा उपक्रम मुंबई उपनगरातील सर्व वॉर्डमध्ये दिनांक १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत यशस्वीपणे राबविण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात मुंबई शहरातील बालकांचे लसीकरण व स्वच्छ व सुंदर मुंबई उपक्रमाचा आढावा घेतला, त्यावेळी श्री. लोढा बोलत होते.

बैठकीस महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) आशीष शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार, मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा नियोजन अधिकारी भूषण देशपांडे, महापालिका आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी तसेच सहआयुक्त, उपआयुक्त व इतर खातेप्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.लोढा म्हणाले, “मुंबई शहरात गोवर या आजाराचा प्रादुर्भाव लक्षात घेता आरोग्य विभागाने तातडीने बालकांच्या लसीकरणावर भर द्यावा. लसीकरण कार्यक्रमाचे नियोजन वेळापत्रकाप्रमाणे करावे. तसेच ज्या बालकांना गोवरची लागण झाली आहे त्यांना तत्काळ वैद्यकीय उपचार सुरू करावेत”.

स्वच्छ व सुंदर मुंबई उपक्रमासाठी १८८ कोटी रूपयांची तरतूद

स्वच्छ व सुंदर मुंबईसाठी १८८ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, पदपथ, रेल्वे प्लॅटफार्म, उद्याने, मंडई, सार्वजनिक शौचालये, स्वच्छतागृहे, शाळा, महाविद्यालये, शासकीय तसेच निमशासकीय कार्यालये, सागरी किनारे, पर्यटन स्थळे, फ्लायओव्हर या ठिकाणांची मिशन मोडमध्ये स्वच्छता करण्यात येणार आहे. ३९०० स्वच्छतागृहांची दुरूस्ती, नव्याने उभारणी करण्याची कामे करण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हा नियोजनच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन दिला जाणार आहे, अशी माहिती पालकमंत्री श्री.लोढा यांनी यावेळी दिली.

स्वच्छ व सुंदर मुंबई अभियानात शासकीय तसेच निमशासकीय संस्थांबरोबरच नागरिक, खाजगी संस्था, सहकारी गृहनिर्माण संस्था, गृहसंकुले यांना सहभागी करून अभियान सर्वसमावेशक करणे, अभियान कालावधीत सर्वस्तरावर मोठ्या प्रमाणावर जनजागृती करून स्वच्छतेच्या सवयींमध्ये आमुलाग्र बदल (Behavioral Change) घडवून आणणे यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे, असेही पालकमंत्री श्री.लोढा म्हणाले.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील उपनगरांतील असलेल्या विविध विभाग कार्यालयांमध्ये ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या कार्यक्रमाची अंमलबजावणीमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांचे चांगले सहकार्य लाभले, असेही पालकमंत्री श्री.लोढा यावेळी म्हणाले.