ग्रामसडक योजनेचा राज्यस्तरीय आढावा
मुंबई, दि 25 : ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून होणारे रस्ते अधिक दर्जेदार होण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण संकल्पना राबविण्यात येत आहेत. यात गुणवत्तेबाबत कुठलीही तडजोड करू नये. ग्रामीण भागामध्ये रस्त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीष महाजन यांनी केले.
प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना या दोन्ही योजनांची राज्यस्तरीय आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. या बैठकीस ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार मीना, योजनेचे सचिव खंडेराव पाटील, मुख्य अभियंता संभाजी माने तसेच मंत्रालयीन अधिकारी व क्षेत्रीय अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता उपस्थित होते.
अति ग्रामीण, आदिवासी भागात कामाला विशेष गती देण्याबरोबरच कामाकरिता निधी उपलब्ध असताना याकामास प्रशासकीय दिरंगाईमुळे विलंब होऊ नये. यासाठी देखभाल दुरुस्तीची कामे देखील वेळेवर पूर्ण करण्याबाबत सूचना मंत्री श्री.महाजन यांनी संबंधितांना दिल्या. वन विभागातील अडचणी, भाव वाढ फरक याबाबत सुसूत्रता आणण्याबाबतच्या सूचनाही श्री.महाजन यांनी केल्या. यावेळी योजनेच्या सद्यस्थिती बाबत सादरीकरण करण्यात आले तर मुख्य अभियंता संभाजी माने यांनी आभार प्रदर्शन केले.