या केंद्रातून प्रशिक्षणामुळे नवे उद्योजक तयार होतील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास
गडचिरोली, दि. 15 : जिल्ह्यात उद्योगाधारित प्रशिक्षणाला चालना देण्यासाठी तसेच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या कौशल्याचा विकास करण्यासाठी राज्य शासन, जिल्हा प्रशासन व टाटा टेक्नालॉजी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने सेंटर फॉर इन्व्हेंन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन ॲण्ड ट्रेनिंग सेंटर (सीआयआयआयटी) चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञान, उपकरणांनी सुसज्ज अशा या प्रशिक्षण केंद्राची मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पाहणी करून माहिती घेतली.
या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून केवळ मुलांचे प्रशिक्षणच होणार नाही तर गडचिरोलीसारख्या जिल्ह्यातून उद्योजक तयार होतील आणि एकूणच गडचिरोलीच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असे सेंटर सुरू झाल्यामुळे गडचिरोलीमधील युवकांना प्रशिक्षण व रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील. गडचिरोली जिल्ह्याचा सर्वांगिण विकास करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यामध्ये पायाभुत सुविधा विकसित करण्यावर भर देत आहे. रस्ते, रेल्वे, अशा दळवळणाच्या सुविधा, मोबाईल नेटवर्कबाबत वेगाने कार्यवाही सुरू असून आम्ही जिल्ह्यामध्ये विमानतळ विकसित करून हवाई मार्गाने गडचिरोली जिल्ह्याला जोडण्यासाठी प्रयत्न करीत आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
गडचिरोली सारख्या आदिवासी दुर्गम व नक्षल प्रभावित जिल्हयामध्ये उद्योग आधारित प्रशिक्षणाला चालना देण्यासाठी तसेच इंडस्ट्री 4.0 च्या अनुषंगाने, जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या कौशल्याचा विकास करण्याच्या उद्देशाने सेंटर फॉर इन्व्हेंन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन ॲण्ड ट्रेनिंग सेंटर (सीआयआयआयटी) या प्रशिक्षण केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. या प्रशिक्षण केंद्रात उद्योग जगताच्या गरजेनुसार अत्याधुनिक तांत्रिक कौशल्य विकासाच्या संदर्भात विद्यार्थ्यांना नऊ वेगवेगळया तांत्रिक प्रयोग शाळांच्या माध्यमातून प्रशिक्षित करण्यात येणार आहे. या केंद्राची अंमलबजावणी जिल्हाधिकारी, गडचिरोली तसेच गोंडवाना विद्यापीठ यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. या केंद्रामध्ये आधुनिक यांत्रिक उपकरणे, रोबोटिक लाईन, असेंबली लाईन, विद्युत आधारित वाहने (Battery Operated Vehicles) वाहनांचे विविध भाग, यांच्या डिझाईन व उत्पादन याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी संजय मीना, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, टाटा टेक्नॉलाजी गडचिरेाली प्रकल्पाचे व्यवस्थापक गजानन जवंजाळकर आणि प्रकल्प सहाय्यक जीवन काळे आदी उपस्थित होते.