शिर्डी, दि. 22 :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या लोणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोणी येथे करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वसतिगृहाच्या नवीन इमारतीची उत्कृष्टपणे उभारणी केल्याबद्दल विशेष कौतुक केले.
यावेळी महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे-पाटील, समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत कुलकर्णी, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त राधाकिसन देवढे आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दोन्ही वसतिगृहांच्या इमारतींची पाहणी केली. समाजकल्याण आयुक्त डॉ. नारनवरे यांनी मुख्यमंत्र्यांना या वसतिगृह इमारतींची वैशिष्ट्ये सांगितली. मौजे हसनापूर शिवारात मुला-मुलींच्या वसतिगृहाच्या दोन्ही नवीन इमारती उभारण्यात आल्या आहेत. प्रत्येकी २ एकर असे ४ एकरांवर ५४ हजार चौरस फूट बांधकाम करण्यात आले आहे. तळमजल्यासह तीन मजल्यांची सुसज्ज, सुविधायुक्त इमारत बांधण्यात आली आहे. मुलांच्या वसतिगृहासाठी १० कोटी ६५ लाख व मुलींच्या वसतिगृहासाठी १० कोटी ५९ लाख रुपये निधी खर्च करण्यात आला आहे, अशी माहिती आयुक्त श्री.नारनवरे यांनी यावेळी दिली.
