राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत राज्यातील आशा स्वयंसेविकांना केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार एकुण ७८ सेवापैकी नियमित ४ सेवांसाठी केंद्र शासनाकडून राष्ट्रीय आरोग्य अभियानातुन रु. २०००/- इतका मोबदला अदा करण्यात येतो. केंद्र शासनाच्या प्राप्त होणा-या मोबदल्याच्या समप्रमाणात कमाल रु. २०००/- पर्यंत राज्य शासनाच्या निधीतुन संदर्भ क्र. (२) येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच, गटप्रवर्तक यांनाही राज्य शासनाच्या निधीतुन रु. ३०००/- इतका मोबदला देण्यास संदर्भ क्र.(२) येथील शासन निर्णयान्वये मान्यता दिलेली आहे. तसेच, संदर्भ क्र. (३) येथील शासन निर्णयान्वये आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना राज्य शासनाच्या निधीतुन अदा करण्यात येत असलेल्या अनुक्रमे दरमहा रु. २०००/- व रु. ३०००/- या मोबदल्यात अनुक्रमे दरमहा रु. १०००/- व रु. १२००/- अशी एकुण अनुक्रमे रु. ३०००/- व रु. ४२००/- अशी वाढ तसेच, रु.५००/- प्रतिमहा कोविड भत्ता अदा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.
सद्यस्थितीत आशा स्वयंसेविका यांना राज्य शासनाचे दरमहा रु. ३५००/- व केंद्र शासनाचे रु.३०००/- असा एकुण रु. ६५००/- इतका मोबदला अदा करण्यात येतो. तसेच, गटप्रवर्तक यांना राज्य शासनाचे रु. ४७००/- व केंद्र शासनाचे रु. ८७७५/- असा एकुण रु. १३४७५/- मोबदला अदा करण्यात येतो.कोविड महामारीचे सावट अदयापही जगावर असल्याने त्याचा विचार करून शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा देणा-या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक या दोन्ही घटकांच्या भुमिका महत्वाचा असल्यामुळे त्यांना दिल्या जाणा-या मोबदल्यात वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या मानधनात वाढ :
दिनांक १७ मार्च २०२३ रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांची राष्ट्रीय आरोग्य अभियानातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पुरविण्यातील भूमिका व महत्व विचारात घेऊन आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना राज्य निधीतून मोबदला देण्याबाबत शासनाने पुढीप्रमाणे निर्णय घेतले आहेत.
आशा स्वयंसेविका यांना राज्य शासनाच्या निधीतून अदा करण्यात येणा-या दरमहा रुपये ३५००/- या मोबदल्यात दरमहा एकूण रुपये १५००/- एवढी वाढ करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
गटपर्वतक यांना राज्य शासनाच्या निधीतून अदा करण्यात येणा-या दरमहा रुपये ४७००/- या मोबदल्यात दरमहा एकूण रुपये १५००/- एवढी वाढ करण्यास मान्यता देण्यात येत आहे. उपरोक्त अ.क्र. १ व २ मध्ये प्रस्तावित केलेली वाढ १ एप्रिल २०२३ या महिन्यापासून देय होणा-या मोबदल्यात अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
यासाठी सन २०२३-२४ या अर्थसंकल्पिय वर्षामध्ये होणा-या अंदाजे रुपये ५०७७७ कोटी इतक्या वार्षिक आवर्ती खर्चास मान्यता देण्यात येत आहे. तसेच रुपये ५०७.७७ कोटी इतक्या वार्षिक आवर्ती खर्चाची तरतुद आगामी पावसाळी आधिवेशनामध्ये पुरवणी मागणीद्वारे करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
सदर योजना सन २०२३ २४ या वित्तीय वर्षात दिनांक ०१.०४.२०२३ पासून अंमलात येईल व त्यानुसार आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना सदर वाढीव मोबदला दिनांक ०१.०४. २०२३ पासून २२१००१५ या लेखाशिर्षातून अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
सदर शासन निर्णय मा. मंत्रिमंडळाच्या दिनांक १७.०३.२०२३ रोजीच्या बैठकीत मिळालेल्या मान्यतेनुसार तसेच नियोजन विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. २७९/१४७२, दिनांक – १४.१२.२०२२ व वित्त विभागाचा अनौपचारीक संदर्भ क्र. विवि/शिकाना/१७३ दिनांक २३.१२.२०२२ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.
सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढ करणेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.