ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

IND vs AFG : भारतानं ३५ षटकात सामना जिंकला, रोहित शर्माचं वादळी शतक

India vs Afghanistan ODI World Cup 2023 : एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघाचा दुसरा सामना अफगाणिस्तानशी झाला. या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत २७२ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने ३५ षटकांत दोन गडी गमावून लक्ष्य गाठले.

ind vs afg Today Match highlights : क्रिकेट विश्वचषकात भारताची विजयी मोहीम सुरूच आहे. आपल्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने अफगाणिस्तानचा आठ विकेट्सने पराभव केला. या विजयासह भारतीय संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. भारताचे दोन सामन्यात दोन गुण आहेत. तर न्यूझीलंडचेही दोन सामन्यात दोन गुण आहेत. पण नेट रनरेटच्या आधारे न्यूझीलंड अव्वल स्थानावर कायम आहे.

दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ८ गडी गमावून २७२ धावा केल्या. त्यांच्याकडून कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने ८० धावांची तर अजमतुल्ला उमरझाईने ६२ धावांची खेळी खेळली. याशिवाय एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. तर भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. तर बर्थडे बॉय हार्दिक पांड्याने दोन विकेट घेतल्या.

प्रत्युत्तरात भारताने ३५ षटकांत दोन गडी गमावून लक्ष्य गाठले. या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी पहिल्या विकेटसाठी १८ षटकात १५६ धावा ठोकल्या. इशान किशन ४७ चेंडूत ४७ धावा केल्या. तर रोहित शर्माने अवघ्या ८४ चेंडूत १३१ धावा कुटल्या. हिटमॅनने आपल्या खेळीत ५ षटकार आणि १६ चौकार मारले. तर विराट कोहली ५६ चेंडूत ५५ धावा करून नाबाद राहिला.

विराटने ३५व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चौकार मारून टीम इंडियाला विजय मिळवून दिला. विराटचे वनडे कारकिर्दीतील हे ६८ वे अर्धशतक ठरले. त्याचवेळी त्याचे हे सलग दुसरे अर्धशतक ठरले. विराटने गेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात ८५ धावा केल्या होत्या. भारताचा पुढचा सामना आता १४ ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये पाकिस्तानशी होणार आहे.

रोहित शर्माच्या नावावर वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक शतकं

भारतीय कर्णधार रोहित शर्माने बुधवारी (११ ऑक्टोबर) एकदिवसीय विश्वचषकात इतिहास रचला. नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर अफगाणिस्तानविरुद्ध त्याने शानदार शतक झळकावले. रोहित वनडे वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक शतके करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने या बाबतीत महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. रोहितच्या नावावर ७ शतके झाली आहेत. सचिनने ६ शतके झळकावली होती.