ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

‘भारतीय नौदलाचे कार्य प्रेरणादायी’ – नौदलाचे कामकाज पाहून विधिमंडळ सदस्यांच्या भावना

मुंबई, दि. १० : भारतीय नौदलाचे कामकाज कसे चालते, युद्धनौकांचे संचलन कसे होते, युद्धनौकेवरील जवान कशा पद्धतीने खडतर परिस्थितीत कामकाज करतात, शोध आणि बचाव कार्यात भारतीय नौदल कशा पद्धतीने योगदान देते याची प्रत्यक्ष पाहणी करण्याची संधी आज विधानमंडळ सदस्यांना मिळाली. भारतीय नौदलाचा पश्चिम विभाग आणि महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र यांच्यामार्फत आयोजित करण्यात आलेल्या ‘एक दिवस समुद्रावर’ या कार्यक्रमांतर्गत युद्धनौकेस भेट देण्याच्या या उपक्रमात विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री जयकुमार रावल, महादेव जानकर यांच्यासह भारतीय नौदलाचे व्हाईस ॲडमिरल आर. स्वामिनाथन, रेअर ॲडमिरल महेश सिंह, नौसेनेच्या पश्चिम बेड्याचे कमांडींग ऑफिसर समीर सक्सेना आदी वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

आमदार संजय सावकारे, अमोल मिटकरी, आकाश फुंडकर, समाधान औताडे, राजेश एकडे, हरीश पिंपळे, शेखर निकम, अनिल भाईदास पाटील, कुमार आयलानी, वसंत खंडेलवाल, रोहित पवार, अभिमन्यू पवार, राजू पारवे, बाबासाहेब पाटील, नामदेव ससाणे, समीर कुणावार, राम पाटील रातोळीकर, लक्ष्मण पवार, गीता जैन, संजय शिंदे, साहसराम करोटे, विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी सहभाग घेतला. नौदलाचे सामर्थ्य, त्याचे युद्ध कौशल्य आणि दैनंदिन जीवनमान याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांनी घेतला.

भारतीय नौदलाच्या आयएनएस चेन्नई, आयएनएस विशाखापट्टणम, आयएनएस तेग आणि आयएनएस तबर या युद्धनौकांमधून समुद्र सफर करुन विधिमंडळ सदस्यांनी नौसेनेच्या कामकाजाची प्रत्यक्ष माहिती घेतली.

भारतीय नौदलाच्या विविध नौका नेहमीच युद्धसज्ज असतात. या सज्जतेची माहिती यावेळी देण्यात आली. आपत्तीच्या वेळी हेलिकॉप्टरमार्फत शोध आणि बचाव कार्य कशा पद्धतीने केले जाते याचे प्रात्यक्षिक करण्यात आले. रासायनिक, आण्विक किंवा जैविक हल्ला झाला तर त्यापासून बचावासाठी काय काय केले जाते याचे नाट्यरुपांतरणाद्वारे सादरीकरण करण्यात आले. मिसाईल फायरींगची माहिती देण्यात आली. जॅकस्टेल (एका युद्धनौकेवरुन दुसऱ्या युद्धनौकेवर जवानांचे किंवा युद्धसाहित्याचे स्थलांतर) याचे प्रात्यक्षिक करण्यात आले. यासाठी नौदल जवानांनी आयएनएस चेन्नईवरुन आयएनएस विशाखापट्टणमवर रोपवेद्वारे स्थलांतर केले.

शोध आणि बचाव कार्यातील अग्रणी चेतक हेलिकॉप्टर, पाणबुडी शोधक सिकींग ४२ ब्रेव्हो हेलिकॉप्टर यांचेही प्रात्यक्षिक करण्यात आले. सिंधुराज पाणबुडीचे संचलन करण्यात आले. त्याचबरोबर लढाऊ विमाने डॉर्निअर, मिग २९ के, चेतक, एएलएच, पी ८ आय, आयएल, सी किंग या विमानांचे प्रत्यक्ष सादरीकरण करण्यात आले. अँटी मिसाईल डिफेंड कसा केला जातो याची माहिती देण्यात आली. जहाजाद्वारे जहाजाला केला जाणारा तेलपुरवठा, युद्धनौकांवर होणारे हेलिकॉप्टरचे लँडींग, युद्धनौकेवरील उपलब्ध शस्त्रसाठा आणि दारुगोळा अशा विविध अनुषंगाने नौसेनेमार्फत युद्धनौकांद्वारे केल्या जाणाऱ्या कामकाजाची माहिती देण्यात आली.

विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर यावेळी म्हणाले की, देशाच्या संरक्षणात भारतीय नौदलाचे योगदान महत्त्वाचे आहे. नौदलाची ताकद, त्यांची क्षमता, त्यांचे अतुलनीय कार्य, नौदल जवानांचे योगदान, त्यांचे खडतर कामकाज आदी माहिती या अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने घेता आली. यामुळे भारतीय नौदलाविषयीचा आदरभाव अजून दृढ झाला आहे. देशाची सुरक्षा भक्कम आहे याची खात्री झाली आहे. देशाच्या प्रती नौदलाचे आणि नौसैनिकांचे असलेले योगदान अनन्यसाधारण असे आहे, असे त्यांनी सांगितले.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणाले की, नौदलाचे कार्य पाहून आपला देश सुरक्षीत हाती आहे याची खात्री पटली आहे. नौसैनिकांचे कामकाज प्रेरणादायी आहे. कुटुंबापासून दूर राहून नौसैनिक काम करतात. देशाच्या संरक्षण सज्जतेत त्यांचे योगदान फार महत्त्वाचे आहे.  नौसेनेसमवेत ‘एक दिवस समुद्रावर’ हा उपक्रम सर्वसामान्य नागरीकांसाठीही राबविण्यात यावा. यामुळे लोकांनाही लष्कराच्या कामकाजाची, सैनिक घेत असलेल्या कठोर परिश्रमाची आणि देशाप्रती असलेल्या त्यांच्या योगदानाची प्रत्यक्ष माहिती घेता येईल. आजच्या दौऱ्यामुळे नौसेनेच्या कामातून मोठी प्रेरणा मिळाली, असे ते म्हणाले.

सर्व आमदार, अधिकारी यांनीही नौसेनेच्या कामकाजाची माहिती घेतली आणि देशाप्रती असलेले त्यांचे योगदान कधीही न विसरण्यासारखे आहे, अशा प्रतिक्रिया दिल्या. आयएनएस चेन्नई या युद्धनौकेवर कॅप्टन म्हणून संदीप सिंह रंधाना यांनी कामकाज पाहिले. लेफ्टनंट परेश देशपांडे यांनी युद्धनौका आणि त्याच्या विविध क्षमतांविषयी माहिती दिली.