ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

विकास योजना आणि प्रकल्पांची माहिती मुख्यमंत्री डॅशबोर्डद्वारे मिळणार – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 3 : राज्य शासनाच्या महत्त्वाच्या विकास योजना आणि महत्त्वाच्या विकास प्रकल्पांची सद्यस्थिती नेमकी काय आहे, त्यात काय अडचणी आहेत याची माहिती मुख्यमंत्री (सीएम) डॅशबोर्डद्वारे तात्काळ मिळणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. मुख्यमंत्री डॅशबोर्डची रचना वापरकर्त्यांसाठी सुलभ आणि सहज असण्यावर भर देण्यात येणार असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

मंत्रालयातील मुख्यमंत्री वॉर रुममध्ये मुख्यमंत्री डॅशबोर्डसंदर्भात सादरीकरण आणि मध्य प्रदेश मुख्यमंत्री डॅशबोर्डचे काम पाहणाऱ्या अधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, माहिती व तंत्रज्ञानचे प्रधान सचिव असिम कुमार गुप्ता, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालक जयश्री भोज, उपमुख्यमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री डॅशबोर्डच्या पुढील नियोजन आणि अंमलबजावणीबाबत मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र बैठक घेण्यात येणार आहेत. या बैठकीत आज सुचविण्यात आलेल्या मुद्दयांचा विचार करण्यात येणार आहे. तसेच मुख्यमंत्री डॅशबोर्डबाबत पुन्हा एकदा सविस्तर चर्चा होणार असल्याचे श्री. मुनगंटीवार म्हणाले.

“एखाद्या जिल्ह्यातील योजनेवर कशाप्रकारे अंमलबजावणी सुरू आहे, हे मुख्यमंत्र्यांना त्यांच्या कार्यालयात बसूनच यापुढे कळेल अशी रचना या मुख्यमंत्री डॅशबोर्डची असणार आहे. यासाठी स्वतंत्र तज्ज्ञ अधिकाऱ्यांचे एक पथक नियुक्त करण्यात येईल. मुख्यमंत्री डॅशबोर्डचा भर प्रामुख्याने सामान्यांना देण्यात येणाऱ्या सेवा, महाराष्ट्रात राबविण्यात येणाऱ्या योजना आणि विकास प्रकल्पांची माहिती, सर्वसामान्यांनाकडून येणाऱ्या तक्रारी आणि महत्वाच्या प्रकल्पांची सद्यस्थिती आणि नियोजित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याला प्राधान्य या चार बाबींवर असेल”, असेही श्री. मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

श्री. मुनगंटीवार म्हणाले की, मुख्यमंत्री डॅशबोर्डद्वारे शासनाचे सर्व विभाग तसेच त्यांच्या सर्वसामान्यांसाठी असलेल्या सेवा ऑनलाईन स्वरुपात मिळणार आहेत.24 तास ऑनलाईन सेवा आणि समस्यांचे तत्काळ निराकरण यामुळे मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्यांना मुख्यमंत्री डॅशबोर्डचा फायदा होणार आहे.

“मुख्यमंत्री डॅशबोर्डचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे महत्वाच्या प्रकल्पांची सद्यस्थिती तत्काळ समजण्यास मदत होणार आहे. विविध विभाग, सेवा आणि अधिकाऱ्यांच्या कामाचे मूल्यमापन करणे, जिल्हा आणि तहसील पातळ्यांवर नेमकी काय प्रगती सुरू आहे, हे मुख्यमंत्री डॅशबोर्डाद्वारे समजण्यास मदत होईल”, असे उद्योगमंत्री उदय सामंत यावेळी म्हणाले.

यावेळी उपस्थितांना मध्य प्रदेश मुख्यमंत्री डॅशबोर्ड तसेच मुख्यमंत्री हेल्पलाईनचे काम कसे होते याबाबतची पूर्ण माहिती दूरदृश्य प्रणालीद्वारे देण्यात आली.

००००