‘चेन्ना’ प्रकल्पासाठी माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांचा पुढाकार
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न
अहेरी:मागील ४० वर्षांपासून रखडलेला आणि मुलचेरा तालुक्यासाठी वरदान ठरू पाहणाऱ्या चेन्ना सिंचन प्रकल्पाची समस्या मार्गी लावण्यासाठी माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी पुढाकार घेतला असून नुकतेच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथील हरिसिंग सभागृहात विविध विभागांची बैठक पार पडली.
१३ मे १९७७ रोजी १.८२ कोटींच्या चेन्ना सिंचन प्रकल्पाला मान्यता मिळाली होती.या प्रकल्पामुळे येथील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार होता.१९८०-८१ पर्यंत या प्रकल्पाचे जवळपास ७० टक्के काम झाले होते.त्यांनतर वनकायद्याचा अडथळ्यामुळे बांधकाम ठप्प पडले.२०१४ मध्ये केंद्र आणि राज्यात भाजप सत्तेत आल्यावर वनविभागाकडून एफएआर प्रमाणपत्र मिळाल्यावर या सिंचन प्रकल्पाची समस्या मार्गी लागणार अशी आशा होती. मात्र,चेन्ना सिंचन प्रकल्पाची समस्या काही सुटली नाही.
त्यामुळे पुन्हा एकदा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी मुलचेरा येथील शिष्टमंडळ घेऊन नागपूर गाठले आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांची बैठक पार पडली.त्यात चेन्ना प्रकल्प पूर्णत्वास आणण्यासाठी सकारात्मक चर्चा करण्यात आली असून वन विभाग पूर्णपणे सहकार्य करणार असून पाहिजे ती निधी उपलब्ध करून देणार मात्र,सिंचन विभागाने पुढाकार घ्यावे असे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.पुढच्या आठवड्यात उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली या संदर्भात महत्वाची बैठक संपन्न होणार असून हा प्रकल्प मार्गी लागणार अशी पुन्हा एकदा आशा निर्माण झाली आहे.
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम,वनविभागाचे प्रधान सचिव नरेश झुरमारे,सिंचन विभागाचे एसी रामटेके,गडचिरोलीचे वन संवरक्षक रमेश कुमार,आलापल्ली वन विभागाचे उपवनसंरक्षक राहुल सिंह टोलिया, चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी उत्तम तोडसाम,मुलचेराचे तहसीलदार चेतन पाटील तसेच बंगाली आघाडीचे विदर्भ प्रभारी दीपक हलदार,भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश दत्ता, शैलेंद्र खराती,भाजपचे मुलचेरा तालुकाध्यक्ष संजीव सरकार,भाजपचे जिल्हा सचिव बादल शहा,तालुका महामंत्री सुभाष गणपती,बंगाली आघाडी जिल्हा सरचिटणीस बिधान वैद्य,विजय बिश्वास,बेपारी,आदी उपस्थित होते.!