ग्राहकांना विमा कवचाची रक्कम, विम्यातून वगळलेल्या गोष्टी आणि दाव्यांची प्रक्रिया आदी मूलभूत गोष्टींची माहिती सहजसोप्या भाषेत देणे विमा कंपन्यांसाठी बंधनकारक होणार आहे. या नवीन नियमाची अंमलबजावणी नववर्षाच्या सुरूवातीपासून, म्हणजे 1 जानेवारी 2024 पासून होणार आहे. भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरणाने याबाबत सर्व विमा कंपन्यांना उद्देशून परिपत्रक काढले आहे.
आधीच्या नियमांत सुधारणा करून नवीन नियमावली तयार करण्यात आली आहे. यानुसार, ग्राहकांना त्यांच्या पॉलिसीचे मूलभूत माहितीचे तपशील त्यांना समजतील, अशा प्रकारे विमा कंपन्यांना द्यावे लागतील. ग्राहक माहिती तपशिलाच्या या सुधारित नियमांची अंमलबजावणी 1 जानेवारी 2024 पासून होणार आहे. ही माहिती ग्राहकाला हवी असल्यास स्थानिक भाषेतही उपलब्ध करून द्यावी लागणार आहे.