मुंबई, दि. ६ : मुंबईत पुढील वर्षी जानेवारी महिन्यात आंतरराष्ट्रीय पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई फेस्टिव्हल फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली असून प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा हे या फाऊंडेशनचे अध्यक्ष आहेत, अशी माहिती पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.
मंत्री श्री. महाजन यांनी आज दुपारी उद्योगपती श्री. महिंद्रा यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, मुंबईसह राज्यातील पर्यटनाच्या वृध्दीसाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. या उपाययोजनांचा एक भाग म्हणून मुंबई आंतरराष्ट्रीय पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल. यानिमित्त मुंबई फेस्टिव्हल फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. या फाऊंडेशनच्या अध्यक्षपदी श्री. महिंद्रा यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय या फाऊंडेशनमध्ये प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, अभिनेते सचिन पिळगावकर, चित्रपट निर्माते मधुर भांडारकर यांच्यासह मान्यवरांचा समावेश आहे.
देश- विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी या महोत्सवाच्या माध्यमातून मुंबई शहराचा इतिहास, संस्कृती, खाद्य संस्कृती, पर्यटन, खरेदी, चित्रपटसृष्टी, संगीत, कला, क्रीडाविषयक माहिती पर्यटकांना देण्यात येईल. त्यामुळे पर्यटन क्षेत्राच्या विस्ताराला मदत होईल. या फाऊंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल. या कालावधीत देश- विदेशातील पर्यटक मुंबईसह राज्याकडे आकर्षित होतील. त्यामुळे पर्यटनासह पर्यटनावर आधारित व्यवसायांचा विस्तार होईल, असाही विश्वास मंत्री श्री. महाजन यांनी व्यक्त केला.