ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

राज्यातील गर्भवती महिलांच्या सुरक्षिततेसाठी ‘किलकारी’ योजनेचा शुभारंभ

आशा सेविकांसाठी मोबाईल अकादमी

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्यावतीने गर्भवती महिलांच्या सुरक्षिततेसाठी ‘किलकारी’ या नव्या योजनेचा व आशा सेविकांसाठी मोबाईल अकादमीचा आजपासून राज्यात शुभारंभ झाला. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, केंद्रीय मंत्री डॉ. एस. पी. सिंग बघेल, गुजरातचे आरोग्यमंत्री ऋषिकेश पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे नवी दिल्ली येथून डॉ. भारती पवार यांनी महाराष्ट्र व गुजरात राज्यासाठी या योजनेचे लोकार्पण केले.

यावेळी डॉ. पवार म्हणाल्या की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे मातृ व शिशु आरोग्यासंबंधी नेहमी आग्रही असतात. त्यांच्या प्रेरणेने देशातील 18 राज्यात ही योजना सुरु असून, महाराष्ट्रातील सुमारे 28 लाख व गुजरात राज्यातील 22 लाख नोंदणी केलेल्या गरोदर मातांना याचा लाभ होईल. या योजने अंतर्गत गर्भवती महिलेने आपल्या गावातील आशा सेविकेकडे नाव नोंदवणे आवश्यक आहे.  सर्व गरोदर मातांनी नोंदणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले. नोंदणी केलेल्या गरोदर मातेला चौथ्या आठवड्यापासून मोबाईलवर मोफत व स्थानिक भाषेत औषधे, आहार, लसीकरण, मानसिक, शारीरिक स्थिती इत्यादी बाबतचे मार्गदर्शन बाळ एक वर्षाचे होईपर्यंत केले जाणार आहे. “प्रसूतीआधी, प्रसूतीनंतर, किलकारी प्रत्येक कुटुंबासोबत” हे योजनेचे ब्रीद वाक्य आहे.

आशा सेविकेचे कौशल्य वाढविण्यासाठी मोबाईल अकादमीचा शुभारंभही यावेळी करण्यात आला. त्याद्वारे राज्यातील 85 हजार आशांना कामकाज करताना उपयोगी होईल, असे ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यावेळी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आरोग्य विभागाचे अतिरिक्त संचालक डॉ. नितिन अंबाडेकर, डॉ. गडेकर, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या उपसंचालक श्रीमती रंगोली पाठक, श्रीमती गरिमा गुप्ता, मोहल कमील, श्री. मन्ना आदी उपस्थित होते.