गडचिरोली: मूल दत्तक घेण्यासंदर्भात कायद्याविषयी माहिती सर्वसामान्य लोकांना व्हावी या उद्देशाने दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात संपूर्ण देशात आंतरराष्ट्रीय दत्तक महिना म्हणून साजरा करण्यात येत असून त्यानुसार गडचिरोली जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दत्तक कायद्याविषय जनजागृती व बालहक्क सप्ताह (14 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर) साजरा करण्याकरिता मा. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात आले. यावेळी उपस्थित जिल्हा परीविक्षा अधिकारी विनोद पाटील, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरणुले, बाल कल्याण समितीचे सदस्य डॉ. संदीप लांजेवार व दिनेश बोरकुटे, संरक्षण अधिकारी पुरुषोत्तम मुजुमदार व पुरुषोत्तम मेश्राम, पूजा धमाले, उज्वला नाखाडे उपस्थित होते.
त्यानंतर जिल्हा बाल संरक्षण कक्ष गडचिरोली तर्फे आंतरराष्ट्रीय दत्तक महिना नोव्हेंबर साजरा करण्याकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली, महिला व बाल रुग्णालय, बसस्टॉप परीसरात, बाल विकास प्रकल्प कार्यालय, व गडचिरोली शहरातील खाजगी रुग्णालय या ठिकाणी जाऊन पोस्टरच्या माध्यमातून लोकांना दत्तक प्रक्रिया विषय माहिती देवून जनजागृती करण्यात आली. सदर उपक्रम जिल्हा बाल संरक्षण कक्षातील बाल संरक्षण अधिकारी प्रियंका आसुटकर, सामाजिक कार्यकर्ते तनोज ढवगाये, क्षेत्र कार्यकर्ता रविंद्र बंडावार, निलेश देशमुख यांनी जनजागृती केली.
बालक दिन निमित्ताने कारमेल हायकूल गडचिरोली येथे बालसंरक्षण विषयक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये मार्गदर्शक म्हणुन जिल्हा बाल संरक्षण कक्षातील जयंत जथाडे (मास्टर ट्रेनर व सामाजिक कार्यकर्ता) यांनी विद्यार्थ्याना सुरक्षित स्पर्श व असुरक्षित स्पर्श, बालकांचे अधिकार, बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 या कायद्याची माहिती, बालविवाह प्रतिबंधक कायदा, बाल कामगार अधिनियम, पॉक्सो ॲक्ट, बाल संरक्षणविषय काम करणाऱ्या जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय, ग्रामस्तरीय यंत्रणा याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
मुलं दत्तक घेण्याची एक कायदेशीर प्रक्रिया आहे त्यानूसार ती प्रक्रिया पूर्ण करावी लागते ती प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता त्यात कुठंही पैशाच्या व्यवहाराचा उल्लेख नाही. आणि कुणालाही पैसे देण्याची आवश्यकता नाही एकाद्याला मुल दत्तक घायचं असेल तर cara.nic.in (सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स अथॉरिटी) या संकेस्थळाला भेट द्यावी किंवा जिल्हा महिला व बाल विकास विभागाशी संपर्क करावा असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांनी केले आहे.