मुंबई, दि. ३० : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या ‘लोकराज्य’ मासिकाच्या नोव्हेंबर २०२२ च्या “चला जाणूया नदीला” या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
‘लोकराज्य’ च्या या विशेषांकामध्ये राज्यभर राबविण्यात येत असलेल्या ‘चला जाणूया नदीला’ या उपक्रमासंदर्भात विशेष लेखांचा समावेश करण्यात आला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ नद्यांच्या परिक्रमेचा उपक्रम राज्य शासनाने लोकसहभागातून हाती घेतला आहे. या अनुषंगाने राज्यात ७५ नद्यांचे संवर्धन करणे, नद्या समजून घेणे, नद्यांची जपणूक कशी करावी, पावसाच्या पाण्याचे नियोजन, तसेच भूशास्त्रीय रचना, वर्षा चक्र, पीकचक्र, नद्यांशी संवाद इत्यादी विषयांचा या अंकात सविस्तर उहापोह करण्यात आला आहे. याबरोबरच मंत्रिमंडळ निर्णय व महत्त्वपूर्ण घडामोडी, नेहमीची सदरेही अंकात समाविष्ट आहेत.
हा अंक माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या https://dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच https://mahasamvad.in या पोर्टलवर वाचण्यासाठी मोफत उपलब्ध आहे.
