‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ तंत्रज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन
नागपूर, दि. 04 : देशातील युवा पिढीला 21 व्या शतकातील जागतिक स्पर्धेसाठी तयार करण्याची गरज आहे. यासोबतच सर्वच क्षेत्रात अग्रेसर होत 2047 पर्यंत विकसित राष्ट्र म्हणून जगापुढे उभे राहायचे आहे. त्यासाठी विद्यापीठांमधून जागतिक दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण देत भारताला वैश्विक ज्ञान केंद्र बनविण्याचे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी आज केले.
सिव्हिल लाईन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती सभागृहात आयोजित समारंभात राज्यपाल तथा विद्यापीठांचे कुलपती रमेश बैस यांच्या हस्ते शिक्षक दिनानिमित्त विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांची उपस्थिती होती. यावेळी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॅा. राजू हिवसे यांच्यासह विविध विभागांचे अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पुरस्कारार्थींचे कुटुंबीय उपस्थित होते.
राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवन साधना पुरस्कार, आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार, डॉ. आर. कृष्णकुमार सुवर्णपदक, प्राचार्य श्री. बलराज अहेर स्मृती सुवर्णपदक, शताब्दी महोत्सव सुवर्णपदक आदी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. विद्यापीठाच्या जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यास मदत केलेल्या शासकीय अधिकाऱ्यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला तसेच विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन वार्षिकांक स्पर्धेचे पुरस्कार वितरित करण्यात आले.
भारताच्या गतकाळातील वैभवाचा संदर्भ देत राज्यपाल म्हणाले की, एकेकाळी भारत हा जगातील सर्वच क्षेत्रात आघाडीवर असलेला देश होता. जगभरातील लेखक आणि इतिहासकारांनी देशाच्या प्रगतीचा गुणगौरव आपल्या ग्रंथांमध्ये केल्याचे वाचावयास मिळते. कापड, रेशीम, वास्तूकला अशा विविधांगी क्षेत्रात आपल्या देश आघाडीवर होता. युरोप किंवा आशिया खंडातील अन्य राष्ट्रांच्या तुलनेत भारत हा उद्योग आणि निर्मिती क्षेत्रात आघाडीवर असल्याचे पहायला मिळाले आहे. गतकाळातील हे वैभव पुन्हा प्राप्त करायचे झाल्यास दर्जेदार शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. यासाठी शैक्षणिक गुणवत्ता ही जागतिक दर्जाची राखण्याची गरज असल्याचे सांगत राज्यपालांनी शिक्षणाचे महत्व यावेळी अधोरेखित केले.
जगभरातील विविध विद्यापीठांमध्ये गुणवत्तापूर्ण अभ्यासक्रम आणि विविध शिष्यवृत्त्या दिल्या जातात. देशातील विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांनीही विद्यार्थी केंद्रीत धोरण आखण्याची गरज असल्याचे राज्यपाल श्री. बैस पुढे म्हणाले.
‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ या तंत्रज्ञानाविषयी बोलताना राज्यपाल म्हणाले की, राज्यातील सर्वच विद्यापीठांमध्ये एआय तंत्रज्ञानाची माहिती तसेच तज्ज्ञांचे मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात येण्याची गरज आहे. ‘एआय’ तंत्रज्ञानाचा विद्यार्थ्यांनी सदुपयोग करणे तसेच विद्यापीठ प्रशासनाने प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत हे तंत्रज्ञान पोहोचण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यापीठाचे कुलगुरू डॅा. सुभाष चौधरी यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी विद्यापीठाची गेल्या शंभर वर्षातील वाटचाल आणि शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने गेल्या वर्षभरात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
माजी न्या. विकास सिरपूरकर यांनीही यावेळी आपले विचार केले. पुरस्कारार्थींचे अभिनंदन करीत भविष्यात अधिक जोमाने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॅा. अमृता इंदूरकर आणि डॅा. वर्षा देशपांडे यांनी केले तर आभार प्र-कुलगुरू डॅा. संजय दुधे यांनी मानले.