‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ अभियानाने नववर्षाचे स्वागत
मुंबई दि. 29 :- शहर स्वच्छ, सुंदर, आरोग्यदायी आणि आनंदी करून मुंबईचा कायापालट करण्यात येणार आहे. ‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ हे अभियान लोकसहभागातून यशस्वी करण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.
येत्या १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत ‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानासंदर्भात मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत आयोजित कार्यक्रमात श्री.केसरकर बोलत होते.
मंत्री श्री.केसरकर म्हणाले की, आपण जेथे राहतो त्या भूमीचे ऋण फेडण्याची संधी आपल्याला या अभियानामार्फत मिळत आहे. ‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ हे अभियान लोकसहभागातून यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. शासन आणि नागरिकांनी एकत्रितरित्या काम केल्यास मुंबईचे गतवैभव प्राप्त होऊ शकेल आणि मुंबईचा स्वच्छ आणि सुंदर शहरांच्या यादीत समावेश होईल. आरोग्यदायी मुंबईसाठी तरूणांना व्यसनमुक्त करणे गरजेचे आहे.
विविध सामाजिक संस्था आणि सोसायटीचे प्रतिनिधी हे त्या-त्या विभागाचे नेतृत्व करीत असतात; त्यांना हे अभियान यशस्वी करण्यासाठी महानगरपालिका आणि राज्य शासन सहकार्य करेल. मुंबई भारतातील सर्वात सुरक्षित शहर आहे. दक्षिण मुंबई रात्रीचीही जीवंत राहण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना आखण्यात येणार आहेत. मुंबईतील पुरातन वास्तुंचे जतन करण्यासाठी परिसरातील अतिक्रमण हटवून त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी विशेष प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी राजीव निवतकर म्हणाले की, नव वर्षात ‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’साठी अभियान राबविण्यात येत आहे. विकेंद्रित कचरा प्रक्रिया (Decentralise waste processing) ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, जेणेकरून कचरा वाहतूक आणि कचरा प्रक्रिया कमी करणे शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या अभियानात मोठ्या प्रमाणात लोकसहभाग निश्चितीसाठी स्वयंसेवी संस्था, निमशासकीय संस्था, रेल्वे प्रशासन, महाविद्यालये, शालेय विद्यार्थी, महिला बचतगट, सहकारी गृहनिर्माण संस्था सकारात्मकरित्या सहभागी होणार आहेत. या अभियानांतर्गत शाळेमध्ये स्वच्छता स्पर्धा (चित्रकला, निबंध, नृत्य), नाटक, पथनाट्य, बॅनर, होर्डिंग, प्रभातफेरी , शिक्षण, परिसंवाद आदी उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
अतिरिक्त आयुक्त आशिष शर्मा म्हणाले की, लोकसहभागातून हे अभियान राबविण्यात येणार आहे. नैतिक शिक्षणाबरोबरच सामाजिक जीवनात वावरण्याचे शिक्षण देणे महत्त्वाचे असून, या अभियानाच्या माध्यमातून ते देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
घन कचरा व्यवस्थापनच्या उपायुक्त चंदा जाधव म्हणाल्या की, मुंबई स्वच्छ करण्याचे काम रोज कर्मचारी करीत असतात, महानगरपालिकेचे प्रयत्न आणि त्यावर मिळालेल्या लोकांच्या प्रतिसादामुळे कचरा वर्गीकरण व शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया वाढल्याने प्रती दिवस 6 हजार 500 मेट्रिक टन इतका कचरा कमी झाला. लोकांनी या अभियानात सहभागी होऊन मुंबई स्वच्छ करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
आमदार अमिन पटेल, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, अतिरिक्त आयुक्त आशिष शर्मा, घन कचरा व्यवस्थापनच्या उपायुक्त चंदा जाधव, अभियानाचे प्रमुख समन्वय अधिकारी सुभाष दळवी, माजी मनपाचे आयुक्त गिरीश गोखले, फर्स्ट मुंबई ट्रस्टचे निविल मेहता यांसह अधिकारी, कर्मचारी, नागरिक, संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.