ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

वीज ग्राहकांना महावितरणचे आवाहन फसव्या मेसेजला प्रतिसाद देऊ नका मंगेश बोन्डे कनिष्ठ अभियंता मराविविकं मर्या. वितरण केंद्र मुलचेरा

मुलचेरा:-
वीज ग्राहकांना बनावट मेसेज पाठवून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार होत आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून प्राप्त झालेल्या फसव्या मेसेजला प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन श्री.मंगेश बोन्डे कनिष्ठ अभियंता यांनी केले आहे.

‘मागील महिन्याचे वीजबिल अपडेट नसल्याच्या कारणावरून वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. ताबडतोब सोबत दिलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा,’ असे बनावट मेसेज नागरिकांना पाठवण्यात येत आहेत. यात वीजबिल भरण्यासाठी वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून ऑनलाइन पेमेंटसाठी बनावट लिंक पाठवून ग्राहकांना सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यास सांगितले जाते.

त्यास प्रतिसाद दिल्यास मोबाइल किंवा संगणक हॅक करून बँक खात्यातील रक्कम लंपास होण्याची दाट शक्यता आहे. कोणत्याही वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून अशा प्रकारचे ‘एसएमएस’ व व्हॉट्स ॲप मेसेज किंवा ई-मेल पाठवण्यात येत नाहीत, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणी सायबर सेलमध्ये याआधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.