ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मुलचेरात दोन ठिकाणी होणार महाराजस्व समाधान शिबिर; पत्रकार परिषदेतून तहसीलदार चेतन पाटील यांनी दिली माहिती

मुलचेरा: महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि वेगवान करण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान राबविण्यात येणार असून मुलचेरा तालुक्यात लगाम आणि मुलचेरा असे दोन ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती येथील तहसीलदार चेतन पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेतून दिली.

विशेष म्हणजे अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे नियोजन ठरले असून पहिल्या टप्प्यात ७ मार्च जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, लगाम आणि ८ मे रोजी महसूल मंडळ कार्यालय, मुलचेरा येथे शिबिरांचे आयोजन होणार आहे. त्या अनुषंगाने गुरुवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तहसीलदार चेतन पाटील यांनी लगाम येथे भेट देऊन विविध अधिकारी कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिली आहेत.

लगाम मंडळ कार्यालयांतर्गत येणाऱ्या २२ गावातील नागरिकांना या शिबिराचा लाभ मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली.यात प्रलंबित फेरफार, ७/१२ चुकांची दुरुस्ती, प्रमाणपत्रे, पीएम किसान नोंदणी यांसारख्या सेवा उपलब्ध होणार असून मुलचेरा तालुक्यातील नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन महसुली अडचणींना पूर्णविराम द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

*’या’ सेवांचा मिळणार लाभ*

प्रलंबित फेरफार,7/12 मधील चुकांची दुरुस्ती,डिजिटल स्वाक्षरीचे 7/12 आणि 8-अ उताऱ्यांचे वाटप,उत्पन्न, रहिवासी आणि जातीचे प्रमाणपत्र,नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्र,पी.एम. किसान नोंदणी,अकृषक (NA) तरतुदींबाबत मार्गदर्शन व सुधारणा,नवीन व्यवस्थापनानुसार ‘सनद’ प्रक्रियेची माहिती,सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ मंजूर करणे,विद्यार्थ्यांसाठी दाखले वाटप,तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघनाबाबतच्या प्रकरणांचा निपटारा,सर्वांसाठी घरे योजनेअंतर्गत पट्टे वाटप,अॅग्रीस्टॅक योजना,भूसंपादन व अकृषिक परवानगी प्रकरणी ‘कमी-जास्त पत्रके’ तयार करून गाव दप्तर अद्यावत केली जाणार,ई-मोजणी अर्ज निकाली काढणे,रेशन कार्ड वाटप आदी लाभ दिला जाणार आहे.