ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

पीएम किसान योजनेच्या नियमात मोठे बदल, ‘या’ कागदपत्रांशिवाय 13 वा हप्ता मिळणार नाही…

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा (PM kisan yojana) 12 वा नुकताच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला. देशातील सुमारे 8 कोटी शेतकऱ्यांना 12 व्या हप्त्याचे पैसे मिळाले, मात्र अजूनही 2 कोटींहून अधिक शेतकरी हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. लवकरच ही रक्कम वर्ग केली जाणार असल्याची चर्चा सुरु असतानाच, आता या योजनेच्या 13व्या हप्त्याची (13th installment) चर्चा सुरु झालीय.

पीएम किसान योजनेसाठी मोदी सरकारने आधीच ई-केवायसी बंधनकारक केले आहे. ई-केवायसी न करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. त्यानंतर आता केंद्र सरकारने या योजनेसाठी शेतकऱ्यांना आणखी काही कागदपत्रे आवश्यक केली आहेत. त्याशिवाय 13 व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

पीएम किसान योजनेसाठी आवश्यक गोष्टी

पीएम किसान योजनेत नोंदणी करण्यासाठी आता शेतकऱ्यांना रेशनकार्डची सॉफ्ट कॉपी द्यावी लागणार आहे. यापुढे शेतकऱ्यांना रेशनकार्डची हार्ड कॉपी देण्याची गरज नाही. योजनेच्या पोर्टलवर रेशनकार्डची पीडीएफ स्वरुपातील सॉफ्ट कॉपी अपलोड करता येईल. सोबतच ई-केवायसी केलेलं असणंही आवश्यक आहे. त्याशिवाय 13 व्या हप्त्याचे पैसे मिळणार नाहीत.

शेतकऱ्यांकडे आधार असणे आवश्यक आहे. आधार नसलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. या वेळी 12 व्या हप्त्याची रक्कम न मिळालेल्या बहुतांश शेतकऱ्यांकडे अपूर्ण कागदपत्रे असून, त्यांची भूलेख अपडेट केली जात आहे.

पीएम किसान योजनेत नोंदणी करण्यासाठी आतापर्यंत शेतकर्‍यांना भूलेख, आधार कार्ड, बँक पासबूक व घोषणापत्राची हार्ड कॉपी जमा करावी लागत होती. मात्र, आता ही प्रक्रिया बंद करण्यात आली असून, फक्त सॉफ्ट कॉपी जमा करावी लागणार आहे. या नियमामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचेल, शिवाय, योजनेत पारदर्शकता येईल, असे म्हटले जात आहे.