ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

सामान्यांच्या आरोग्यावरील खर्चात जन औषधी केंद्रांमुळे मोठी बचत -राज्यपाल रमेश बैस यांचे प्रतिपादन

मुंबई दि. 8 : “जन औषधी केंद्रांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यावरील खर्चात मोठी बचत होत आहे. यामुळे गरीब नागरिकालाही औषधोपचार करुन घेणे शक्य होत आहे”, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

भारतीय जन औषधी दिवस आणि आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुढाकाराने यशवंतराव चव्हाण सेंटर येथे एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी राज्यपाल श्री. बैस बोलत होते.

या कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत, प्रधान सचिव संजय खंदारे, सचिव नवीन सोना, आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार आदी उपस्थित होते.

राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, देशातील ७६४ पैकी ७४३ जिल्ह्यांत जन औषधी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांत स्वस्तात उपलब्ध असलेल्या औषधांमुळे सामान्य नागरिकांच्या आरोग्यावरील खर्चात मोठी बचत होत आहे. या केंद्रात १ हजार ७५९ औषधे आणि २८० सर्जिकल उपकरणे उपलब्ध आहेत. येत्या वर्ष अखेरपर्यंत देशभरात सुमारे दहा हजार जन औषधी केंद्र सुरू करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. यामुळे अधिकाधिक रुग्णांना स्वस्त आणि गुणवत्तापूर्ण औषधांचा लाभ मिळेल.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. पवार म्हणाल्या की, जन औषधी केंद्रामधून दिल्या जाणाऱ्या औषधांमुळे अनेक रुग्णांची पैशांची बचत होत आहे. औषधांच्या किंमती कमी झाल्यामुळे अनेक औषधे सामान्य नागरिकांच्या आवाक्यात आली आहेत. जन औषधी केंद्र सुरू करण्यासाठी युवकांनी पुढे यावे. जन औषधी केंद्रांप्रमाणेच आरोग्यासाठी हेल्थ ॲण्ड वेलनेस केंद्र सुरू करण्यात आली आहेत.

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी सांगितले की, कोरोना कालावधीत आशा सेविकांनी चांगले काम केले आहे. जास्तीत जास्त नागरिकांना औषधोपचार मिळावेत यासाठी महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेची मर्यादा वाढवण्याचा विचार व्हावा.

यावेळी जन औषधी सर्वश्रेष्ठ म्हणून सिम्बॉयसिसचे अधिष्ठाता डॉ. विजय सागर, जन औषधी मित्र म्हणून डॉ. तुषार पालवे यांना गौरविण्यात आले.

यावेळी आशा कार्यकर्ती सुशीला भंडारे, नेत्रतज्ज्ञ डॉ. नम्रता सोनवणे, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. पूजा भुतडा यांचा उत्कृष्ट काम केल्याबद्दल महिलादिनी सत्कार करण्यात आला.

यावेळी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील किणी येथील जन औषधी केंद्राचे दूरदृश्यप्रणालीद्वारे उद्घाटन श्री. नीलकंठ खुणे, डॉ. सोनिया बागडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.धनंजय पाटील यांच्या उपस्थ‍ितीत करण्यात आले.

सचिव नवीन सोना यांनी प्रास्ताविक केले, तर अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त भूषण पाटील यांनी आभार मानले.

यावेळी अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, आयुक्त धीरज कुमार, आयुक्त अभिमन्यू काळे, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर, सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, डॉ. स्वप्नील लाळे, जयगोपाल मेनन, सहसंचालक डॉ. गौरी राठोड, उपसंचालक डॉ. विजय बाविस्कर, सहसंचालक डॉ. विजय कंदेवाड, डॉ. कैलास बाविस्कर डॉ. एकनाथ माले आदी उपस्थित होते.