मुलचेरा तहसीलदार चेतन पाटील यांचे आवाहन
मुलचेरा, प्रतिनिधी –स्थानिक शासकीय तसेच वैयक्तिक बांधकाम साठी रेती (वाळू) खरेदी किंवा वाहतूक परवाना प्रक्रियेसाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या महाखनिज पोर्टल (Mahakhanij) वरून ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासंदर्भात मुलचेरा तालुक्याचे तहसीलदार चेतन पाटील यांनी नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे.

तहसीलदार पाटील यांनी सांगितले की, शासनाने रेती उत्खनन व वाहतूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी महाखनिज पोर्टल सुरू केले आहे. त्यामुळे कोणतीही रेती खरेदी, बुकिंग किंवा ई-चालान (e-Transit Pass) काढण्यासाठी संबंधित नागरिकांनी व कंत्राटदारांनी केवळ ऑनलाईन पद्धतीचाच अवलंब करावा.
महाखनिज पोर्टलवर नोंदणी करून आवश्यक तपशील भरल्यानंतर व आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर, 600 रुपये प्रति ब्रास व कर शुल्क भरणा मोबाईल वर आलेल्या पेमेंट लिंकद्वारे ऑनलाईन करता येते.
ग्रामपंचायत हद्दीतील किंवा जवळचे निश्चित करण्यात आलेल्या स्थानिक वाळू गट मधून वाळू उचल व वाहतूक करण्याचे मंजुरीनंतर ई-चालान डाउनलोड करून वाहतुकीदरम्यान सोबत ठेवणे आवश्यक आहे. अवैध रेती वाहतूक किंवा अनधिकृत खरेदी-विक्री आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही तहसीलदारांनी दिला आहे.
मुलचेरा तालुक्यातील नागरिक, बांधकाम व्यावसायिक व संबंधितांनी शासनाच्या नियमांचे पालन करून केवळ अधिकृत महाखनिज पोर्टलद्वारेच व्यवहार करावेत, असे आवाहन तहसीलदार चेतन पाटील यांनी केले आहे.





