ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

बांधकाम कामगारांच्या योजनांमध्ये अडचणी आ. बच्चू कडूंचे मंत्र्यांना निवेदन

माजी राज्यमंत्री तथा विधान परिषद सदस्य आ. बच्चू कडू यांनी राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना भेडसावत असलेल्या विविध समस्यांच्या निराकरणासाठी महाराष्ट्राचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांना सविस्तर निवेदन सादर केले आहे.

निवेदनात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या काही धोरणांमुळे व प्रशासकीय प्रक्रियांमुळे पात्र कामगार आणि त्यांच्या वारसांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील कामगारांमध्ये नाराजी वाढत असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनानुसार, नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या मृत्यूनंतर वारसांना लाभ मिळण्यासाठी असलेली वयोमर्यादेची अट रद्द करावी. पहिल्या दोन अपत्यांपर्यंत प्रसूती योजनेचा लाभ पूर्ववत सुरू करावा. आरोग्य सुविधांसाठी असलेली नूतनीकरणाची अट रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच कामगार नोंदणी व नूतनीकरणाचे ऑनलाइन अर्ज आठवडा किंवा पंधरवड्याच्या आत निकाली काढण्याचे नियोजन करावे. दिव्यांग अपत्य असलेल्या कुटुंबांना तिसऱ्या अपत्यासाठीही योजनांचा लाभ द्यावा. विविध योजनांसाठी आवश्यक कागदपत्रांची स्पष्ट माहिती पोर्टलवर उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

कामगारांना साहित्य संच वाटप करताना होणारा आर्थिक व मानसिक त्रास टाळण्यासाठी साहित्य संचाऐवजी पात्र कामगारांच्या खात्यात थेट अनुदान जमा करावे, अशी मागणीही बच्चू कडू यांनी केली आहे.

ग्रामीण भागातील कामगार नोंदणी व नूतनीकरणासाठी आवश्यक असलेल्या ९० दिवसांच्या कामाच्या प्रमाणपत्रावर ग्रामसेवकांना स्वाक्षरी करण्याचे अधिकार द्यावेत. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नोंदणी, नूतनीकरण व लाभाचे अर्ज तातडीने निकाली काढावेत. तसेच तपासणीतील विलंबामुळे मंजुरीपूर्वी मृत्यू झालेल्या कामगारांच्या वारसांनाही लाभासाठी पात्र ठरवावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

राज्यातील लाखो बांधकाम कामगारांना न्याय मिळावा आणि त्यांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा यासाठी शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा आ. बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे.