ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

जीवघेण्या कोलेस्ट्रॉलवर ‘एक लाखाचे इंजेक्शन’; तरुणाला मिळाले नवे आयुष्य

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी (मेडिकल) संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या एंडोक्रायनॉलॉजी विभागाने जीवघेण्या अनुवंशिक कोलेस्ट्रॉलच्या आजाराने ग्रस्त ३० वर्षीय रुग्णावर यशस्वी उपचार करत सुमारे एक लाख रुपये किमतीच्या ‘इन्क्लिसिरान’ इंजेक्शनद्वारे अत्याधुनिक उपचार करून नवा आशेचा किरण दिला आहे. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून हे महागडे इंजेक्शन मोफत उपलब्ध करून देण्यात आले असून, मेडिकलमध्ये अशा प्रकारचा उपचार प्रथमच करण्यात आला आहे.
दर सहा महिन्याला इंजेक्शन
‘फॅमिलियल हायपरकोलेस्टेरोलेमिया’ तसेच नियमित औषधांनी एलडीएल कोलेस्टेरॉल नियंत्रणात न येणाऱ्या इतर काही रुग्णांसाठी इन्क्लिसिरान हे प्रभावी उपचार आहे. हे इंजेक्शन दर सहा महिन्यांनी एकदा घ्यावे लागते.
…हा आहे दुर्मिळ आनुवंशिक आजार
एंडोक्रायनॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. सुनील अंबुलकर यांनी सांगितले की, या तरुण रुग्णाला ‘फॅमिलियल हायपरकोलेस्टेरोलेमिया’ हा दुर्मिळ आनुवंशिक आजार आहे.
यात रक्तातील एकूण कोलेस्टेरॉलचे प्रमाण ४५० ते ५०० मिलीग्रॅम प्रति डेसिलिटर, तर ‘वाईट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एलडीएल कोलेस्टेरॉलचे प्रमाण २०० ते २५० मिलीग्रॅम प्रति डेसिलिटर इतके वाढते. याशिवाय त्वचेवर व गुडघ्यांच्या सांध्यावर ‘टेंडन झॅन्थोमा’ म्हणजे कोलेस्टेरॉलच्या गाठी होतात.
महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून केली खरेदी
१) अशा रुग्णांना तिशी-चाळिशीतच हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो. रुग्णावर प्रचलित औषधे देऊनही अपेक्षित परिणाम दिसून येत नाही. त्यावर इन्क्लिसिरान इंजेक्शन हे प्रभावी ठरते.
२) शासकीय रुग्णालयात आतापर्यंत या इंजेक्शनचा उपचार झालेला नव्हता. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून हे इंजेक्शन खरेदी करण्यात आले. रुग्णाला पहिल्याच इंजेक्शनने त्याची कोलेस्टेरॉलची पातळी सामान्य झाली