ब्रम्हपुरी : मागील दोन वर्षात कोरोना महामारी संकटामुळे अनेकांचा रोजगार बुडाला. अशा निराशाजनक संकटातून मार्ग काढून संसाराचा गाडा हाकण्यात मोलाचा वाटा उचलनाया मातृशक्तीच्या श्रमाला तोड नाही. मनात जिद्द आणि हृदयात स्वाभिमान या दोन्ही शस्त्रांच्या भरोशावर उज्वल आयुष्याची गाठ बांधणाऱ्या महिलांना चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने उपलब्ध करून दिलेला वित्त पुरवठा व बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांनी घेतलेली उंच भरारी हे यश मागचे खरे कारण असून बचत। गटाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना आर्थिक उन्नतीची प्रेरक चालना मिळाली. असे प्रतिपादन राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री कॉंग्रेस नेते तथा आ. विजय वडेट्टीवार यांनी केले. ते ब्रह्मपुरी येथे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने आयोजित विभागीय स्वयंसहाय्यता बचत गट मेळाव्याच्या प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संतोषसिंह रावत, प्रमुख अतिथी म्हणून उपाध्यक्ष यशवंत दिघोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर, संचालक दोधर मिसार, ललित मोटघरे, प्रकाश बनसोड, सुचित्रा ठाकरे, प्रभाकर सेलोकर, स्मिता पारधी, योगिता आमले, वनिता अलगदेवे, प्रफुल खापर्डे व ब्रम्हपुरी विभागातील बँकेचे अधिकारी, कर्मचारी, तसेच बचत गटाच्या महीला बहुसंख्येने उपस्थित होत्या.
यानंतर पुढे बोलताना आ. वडेट्टीवार म्हणाले की, संसाराची जबाबदारी जरी पुरुषांची असली तरी मात्र संसाराची मूळ अर्थिक पायाभरणी हि महिलांच्या काटकसरीच्या बचतीनेच होते. आज महिलांना आर्थिक उन्नतीसाठी विशेष अर्थसहाय्य बँकेच्या मार्फतीतून बचत गटाच्या माध्यमाने सहज उपलब्ध होत असल्याने ग्रामीण भागातील अवैध सावकारीचा मुळापासून पाया बंद झाल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील अनेक महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून रोजगार उभारला आहे. या प्रेरणादायी चळवळीत चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा मोलाचा वाटा असून मी लोकप्रतिनिधी या नात्याने उपस्थित बचत गटांच्या महिलांकरिता व्यवसायिक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करून प्रशिक्षित महिलांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली. यानंतर बँकेच्या ब्रह्मपुरी विभागाअंतर्गत माजी कॅबिनेट मंत्री आ. विजय वडेट्टीवार यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तर बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत म्हणाले की, बँकेची सूत्र हाती घेण्यापूर्वी बँकेची आर्थिक परिस्थिती हालाखीची होती. अशा कठीण परिस्थितीतही बँकेच्या अधिकारी व कर्मचारी तसेच संचालक मंडळाच्या सहकार्याने विविध योजनेअंतर्गत कर्जवाटप व विशेष वसुली अभियान राबवून आर्थिक बाजू भक्कम करीत मिळालेला लाभांश खातेदारांपर्यंत पोहोचविला. व राज्यात बँकेची यशस्वी वाटचालीचा ठसा उमटविला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याण यांनी बँकेच्या कार्याचा लेखाजोखा मांडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कर्ज समितीचे अशोक पवार तर कार्यक्रमाचे आभार विभागीय अधिकारी महेंद्र मातेरे यांनी मानले. याप्रसंगी हजारोच्या संख्येने बचत गट महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.